पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांची कारवाईः दोघांविरोधात गुन्हा दाखलः 28 हजाराचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / सांगली
सांगली शहरात आयपीएलवर मोठयाप्रमाणात सट्टा खेळला जातो. विविध ठिकाणी हा सट्टा घेतला जातो. याची माहिती सांगली पोलीसांना मिळाल्यानंतर सांगली पोलीसांच्याकडून सर्वत्र आता छापेमारी सुरू करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी वडर कॉलनीमध्ये आयपीएलवरील सट्टा घेण्याच्या ठिकाणी छापा टाकून हा अड्डा उध्दवस्त केला आहे. तर सट्टा घेणाऱया रमजान सलीम मोमीन रा. वडर कॉलनी याला अटक केली आहे. त्याच्याकडून बेटींगचे साहित्य तसेच 27 हजार 830 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने तावडे चौकातील तनवानी हॉटेलमध्ये छापा मारून त्याठिकाणी सुरू असणारा बेटींगचा अड्डा उध्दवस्त केला होता. यामध्ये सांगलीतील दोन संशयित आरोपी निष्पन्न झाले होते. त्यानंतर सांगली पोलीस जागे झाले आणि त्यांनी आपल्या इलाख्यात सुरू असणाऱया आयपीएल बेटींग सट्टाची माहिती काढण्यास प्रारंभ केला. त्यातूनच वडर कॉलनी येथे एकजण आयपीएलवर सट्टा घेत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पोलीस फौजफाटÎासह याठिकाणी छापा मारला असता संशयित रमजान सलीम मोमीन हा राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद या सामन्यासाठी सट्टा घेत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याच्याकडून सट्टा घेत असलेले तीन मोबाईल, टीव्ही तसेच रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच हा अड्डा उध्दवस्त करण्यात आला आहे.
दरम्यान रमजान मोमीन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच त्याच्यावर यापुर्वीही कारवाई करण्यात आली आहे. तरीसुध्दा तो सट्टा घेत असल्याने त्याच्याविरोधात आणखीन कडक कारवाई केली जाणार असल्याचे अजित टिके यांनी सांगितले. दरम्यान मोमीन हा सांगलीवाडी येथील अभिजीत कोळी याच्यासाठी हा सट्टा घेत असल्याचेही तपासात समोर आले आहे त्यानुसार अभिजीत कोळी याला पकडण्यासाठी छापा टाकण्यात आला. पण तो फरार झाला आहे. त्यालाही या प्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. दोन्ही संशयितांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे हे तपास करत आहेत. तसेच हे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील असल्याचेही समोर आले आहे.