ओडिशात सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानात दुर्घटना
भुवनेश्वर / वृत्तसंस्था
ओडिशातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानात लागलेला वणवा विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. भारतातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान असलेल्या ओडिशातील सिमलीपाल उद्यान आगीच्या भक्षस्थानी पडत आहे. या राष्ट्रीय उद्यानातील 21 पैकी 8 रेंजमध्ये आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी आता ओडिशा सरकारने एक उच्चस्तरीय दलाला पाचारण केले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या दुर्घटनेसंबंधी तात्काळ अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
ओडिशातील मयूरभंज जिह्यातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानातील आग काही केल्या नियंत्रणात येत नाही. भारतातील जैवविविधतेच्या दृष्टीकोनातून हे राष्ट्रीय उद्यान अतिशय महत्वाचे आहे. युनेस्कोने 2009 साली सिमलीपालला वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फीयर रिझर्व्हच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. सिमलीपाल नॅशनल पार्क हे 5569 वर्ग किमी मध्ये पसरले आहे. या नॅशनल पार्कमध्ये एलिफंट रिझर्व्ह आणि टायगर रिझर्व्ह आहे. तसेच या उद्यानात बंगाल टायगर, आशियन हत्ती, गौर यांची संख्याही अधिक आहे. सिमलीपाल हे जैवसंपत्तीची खाण आहे. जैवविविधतेच्या बाबतीत सिमलीपाल हे देशातील तिसरे सर्वात मोठे बायोस्पीयर रिझर्व्ह आहे.