वार्ताहर / चिकोडी :
वनखात्याद्वारे रोजगार हमी योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामात नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची मोठी चर्चा जोर धरली असून चिकोडी तालुक्यातील काही गावात मशिनरीचा उपयोग करून कामे करण्यात आली आहेत. याशिवाय रोजंदारी मंजुरीसाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. तर जे रोजंदारी कर्मचारी रोहयो अंतर्गत काम केले आहेत. त्यांचे वेतनही संबंधित खात्याने दिले नसल्याचा थेट आरोप करगाव ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱया डोणवाड व हंचिनाळ या गावात ऐकावयास मिळत आहे.
कोरोनाच्या संकटकाळात रोजंदारीच आपल्या जीवनाचा आधार म्हणणाऱया कर्मचाऱयांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्यासह केंद्र सरकारनेदेखील विविध खात्याद्वारे रोजगार हमी योजनेंतर्गत विकासकामे हाती घेण्याच्या सूचना व आदेश काढले होते. पण वनखात्यात मात्र सरकारच्या या आदेशांना कचऱयाची टोपलीच दाखविण्यात आली असल्याची जोरदार चर्चा सुरु असून वनखात्याद्वारे रोजगार हमी योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
उपलब्ध माहितीनुसार वनखात्याद्वारे प्रतिवर्षी रोपलागवड करण्यात येते. या रोपलागवडसाठी खड्डे काढणे, माती भरणे, रोपे लावणे आदी कामे हाती घेण्यात येतात. चालूवर्षी ही सर्व कामे मशीनऐवजी मानवाद्वारे करून घेण्याचा आदेश आहे. पण वनखात्याद्वारे या आदेशाचे उल्लंघन झाले आहे.
वेतनच नाही
रोजगार हमी योजनेंतर्गत चिकोडी तालुक्यातील करगाव ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱया डोणवाड, हंचिनाळ व करगाव या गावात रोपलागवडीसाठी खड्डे खणणाऱया कर्मचाऱयांना महिना लोटला तरी वेतनच देण्यात आलेले नाही. 10 हून अधिक कर्मचाऱयांना 2 लाखाहून अधिक वेतन देणे बाकी आहे. सदर कर्मचाऱयांनी 10 मीटर लांब, 2 मीटर रुंद व 1 मीटर खोलीचे सुमारे 300 हून अधिक खड्डय़ांची खोदाई केली आहे. या कामात संपूर्ण भ्रष्टाचार झाल्याचा थेट आरोप निंगाप्पा चिकोडी या मजुराने केला आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी व मजुरांचे वेतन त्वरित द्यावे, अशी आपली मागणी असल्याचेही सदर मजुराने सांगितले.
जेसीबीचा वापर
रोजगार हमी योजनेंतर्गत करगाव-बंबलवाड रस्त्याच्या दुतर्फा रोपे न लावताच रोपे लावण्यात आल्याचे दाखवून बील करण्यात आले आहे. डोणवाड ग्राम व्याप्तीत वनखात्याच्या जमिनीत 2 मीटर रुंद, 5 मीटर लांब व 1 मीटर खोलीचे 120 खड्डे, हंचिनाळ गावच्या हद्दीत 200 हून अधिक खड्डे जेसीबीच्या साहाय्याने काढून नकली जॉबकार्ड्सद्वारे बील काढण्यात आल्याचा आरोप करगाव ग्रा. पं. सदस्य अर्जुन किवड यांनी केला आहे.
याविषयी वनखात्याच्या संबंधित अधिकाऱयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. एकंदरीत गरीब मजुरांच्या पोटावर मारुन विकासकामे मशीनद्वारे करण्याचा वनखात्याचा हा कार्यक्रम मात्र संबंधित अधिकाऱयाच्या अंगलट येणार हे मात्र निश्चित.