ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील विक्रोळीमध्ये बेस्टच्या मिनी बसला अपघात झाल्याची घटना आज घडली. बस भांडुप येथून वरळी ला जात असताना हा अपघात झाला. यामध्ये 6 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बसमधून 20 ते 22 प्रवासी प्रवास करत होते. अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करताना बस चालकाचा ताबा सुटला आणि हा अपघात झाला. या अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमधील प्रवाशांना धीर दिला. तर जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून सदर घटनेचा तपास सुरू आहे तसेच विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.