घरफोडय़ांचे लोण आता ग्रामीण भागाकडे : सहाही कुटुंबे मुंबईत वास्तव्यास
कणकवली
कणकवली शहर, परिसरात सुरू असलेले घरफोडय़ांचे लोण आता ग्रामीण भागातही पसरू लागले आहे. रविवारी रात्री वरवडे येथील वरची मुस्लीमवाडी व खालची मुस्लीमवाडी येथील सहा बंद घरांना चोरटय़ांनी लक्ष्य केले. घरफोडय़ांमध्ये चोरटय़ांच्या हाती विशेष काही लागले नसले, तरी वरवडेसारख्या ग्रामीण भागातही घरफोडय़ा होऊ लागल्याने आता चोरटय़ांना रोखणे हे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.
वरवडे येथील वरची मुस्लीमवाडी येथे मशिदीच्या पाठिमागे गयासुद्दीन लतीफ शेख यांचे घर आहे. गयासुद्दीन हे मुंबईला असतात. त्यांच्या घराची चावी शेजाऱयांकडे असते. सोमवारी सकाळी शेजारी महिला ही झाडांना पाणी घालण्यासाठी गयासुद्दीन यांच्या घराकडे आली असता हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतरच्या पाहणीत परिसरातील एकूण सहा घरे चोरटय़ांनी फोडल्याचे स्पष्ट झाले. या सहाही घरातील मंडळी मुंबईला वास्तव्यास असतात, असे पोलिसांनी सांगितले.
शेगडी, रेग्युलेटर चोरीस
झाडांना पाणी घालण्यासाठी आलेल्या महिलेने पाहिले असता, गयासुद्दीन यांच्या घराचा पुढील दरवाजा उघडा दिसला. पुढील पाहणीत कडीकोयंडा तोडलेला दिसला. तर नजीकच कुलूपही पडले होते. याबाबतची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी पाहणी केली असता, किचन रुममधील शेगडी व रेग्यलेटर या वस्तू गायब झाल्या होत्या.
सहा घरे फोडली
गयासुद्दीन यांचे घर चोरटय़ांनी फोडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ग्रामस्थांनी परिसरातील अन्य बंद घरांचीही पाहणी केली. यात आणखी तीन घरे चोरटय़ांनी फोडल्याचे दिसून आले. अब्दुल्ला युसूफ हडकर यांचे स्लॅबचे घर आहे. चोरटय़ांनी मागील व पुढील अशा दोन्ही दरवाजांचे कडीकोयंडे तोडले. मात्र, तेथे चोरटय़ांना काहीच सापडले नाही. मुसा महम्मद शेख यांचे कौलारू घर आहे. तेथेही चोरटय़ांनी मागील व पुढील अशा दोन्ही दरवाजांचे कडीकोयंडे तोडले होते. तर चोरटय़ांनी आतील खोल्यांमधील दरवाजाचेही कडीकोयंडे तोडले. मात्र, तेथेही चोरटय़ांना काहीही सापडलेले नाही. फैमिदा हरून शेख यांचे दुमजली घर आहे. चोरटय़ांनी तेथेही दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. मात्र, फैमिदा यांच्या घराच्या दरवाजावर मधमाशांचे पोळे आहे. कदाचित याच कारणामुळे चोरटय़ांनी दरवाजा उघडून आत प्रवेश करण्याची हिंमत केलेली नसावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. तसेच खालची मुस्लीमवाडी येथील नवसिम इसाक शेख व रफिक रजाक शेख यांची घरेही चोरटय़ांनी फोडली.
पोलिसांकडून पंचनामा
घरफोडय़ांबाबत ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर कणकवलीच्या हवालदार ममता जाधव यांनी चारही घरांचा पंचनामा केला. यात सहाही ठिकाणी चोरटय़ांनी दरवाजाचे कडीकोयंडे तोडून आत प्रवेश केल्याचे दिसून आले. तर गयासुद्दीन यांच्या घरातील शेगडी व रेग्युलेटर वगळता अन्य घरांतून चोरीस काहीही गेले नसल्याचे जाधव यांनी सांगितले. पाहणीप्रसंगी याकुब आदम शेख, रियाज कासम शेख, मुस्तुफा कासद खान, सलीत आजिस खोत, सादीय करीम खोत, नईमा शाबुद्दीन शेख, अख्तारी इक्बाल शेख आदी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
पोलिसांसमोर आव्हान
कणकवली शहर, परिसराला मागील कित्येक वर्षांपासून घरफोडय़ांनी ग्रासले आहे. मागील काही दिवस थांबलेले हे घरफोडय़ांचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने पोलिसांसोबत नागरिकांचीही डोकेदुखी वाढली आहे. सुरुवातीला कणकवली शहर, कलमठ येथील घरफोडय़ांनंतर पोलिसांनीही रात्र गस्तीत वाढ केली. मात्र, आता ग्रामीण भागातही घरफोडय़ा होऊ लागल्याने चोरटय़ांना रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.