प्रतिनिधी/ खेड
बुधवारी दुपारी प्राप्त अहवालानुसार तालुक्यातील वरवली-धुपेवाडीतील आणखी 10 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. वरवली-धुपेवाडीतील कोरोनाबाधितांची संख्या 41 वर पोहोचल्याने ग्रामस्थांचीही चिंता वाढली आहे. आंबवली न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांचेही स्वॅब घेण्यात आले असून या अहवालाकडे साऱयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान धास्तावलेल्या आरोग्य यंत्रणेच्या 3 पथकांनी गेल्या 3 दिवसांपासून गावातच तळ ठोकला आहे.
778 लोकसंख्या असलेल्या 269 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. एका विद्यार्थ्यास कोरोनाची बाधा झाल्याने त्या विद्यालयातील अन्य विद्यार्थ्यांची बुधवारी कोरोना चाचणी करण्यात आली. तालुक्यात कोरोना नियंत्रणात येत असतानाच वरवली-धुपेवाडीतील 27 जणांना कोरोना झाल्याने आरोग्य यंत्रणांसह ग्रामस्थ धास्तावले आहेत. वरवलीतील 4 वाडय़ां कंन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. या चारही वाडय़ांतील घरांचे तातडीने सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी 3 पथके तैनात असून त्यात 7 कर्मचाऱयांचा समावेश आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेळके परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
वरवली-धुपेवाडीतील 33 पैकी 30 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आला मात्र, यातील तिघांना कोरोनाची बाधा झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. नव्याने आढळलेल्या 3 कोरोनाबाधितांच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब बुधवारी घेण्यात आले. तालुक्यात कोरोनाचे रूग्ण झपाटय़ाने वाढत असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी, शासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी केले आहे. नियम अधिक कडक करण्याची वेळ येवू देवू नका, असेही सूचित केले आहे.