वृत्तसंस्था / लंडन
वर्णद्वेषविरोधात लंडनमध्ये आयोजिलेल्या ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ मोहिमेतील मोर्चामध्ये विडींजचा अष्टपैलू कार्लोस ब्रेथवेटने आपला सहभाग दर्शविला होता. या मोर्चामध्ये अमेरिकेत पोलीस कस्टडीत मरण पावलेल्या कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड प्रकरणाची चौकशी करावी, अशा घोषणा देण्यात आल्या. क्रीडा क्षेत्रातील अनेक क्रीडापटूंनी या मोर्चामध्ये आपला सहभाग दर्शविला होता. शनिवारी झालेल्या या मोर्चामध्ये हेविवेट गटातील विश्वविजेता मुष्टियोद्धा अँथोनी जोशुआ याचे वर्णद्वेषासंदर्भात भाषण झाले. सध्या जगात कोरोना व्हायरस पसरत असताना आता वर्णद्वेषाचा व्हायरसही पुन्हा पहावयास मिळत असल्याचे त्याने म्हटले आहे. संपूर्ण जगातील वर्णद्वेष यापूर्वीच संपुष्टात आला असताना पुन्हा तो आपले डोके वर काढत असल्याचे दिसून येते. वर्णद्वेषाला कोणत्याही राष्ट्राकडून पाठिंबा मिळू नये, असे आवाहन जोशुआने केले आहे.