वृत्तसंस्था/ सोफिया, बल्गेरिया
गुरुवारपासून येथे वर्ल्ड ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धा सुरू होत असून टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी साधण्याचा प्रयत्न अनुभवी मल्ल अमित धनकर अन्य अकरा मल्लांसह करणार आहे.
32 वर्षीय धनकर तीन वेळचा राष्ट्रकुल चॅम्पियन आहे. मात्र त्याला ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत एकदाही खेळता आले नाही. कारण कारकिर्दीत अनेकदा 66 किलो गटात त्याला योगेश्वर दत्तला मागे टाकता आले नाही. 2019 मध्ये चीनमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 74 किलो वजन गटात धनकरने रौप्यपदक मिळविले होते. हे त्याचे शेवटचे मोठे यश होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्याचे त्याचे स्वप्न चाचणी स्पर्धेत पराभूत झाल्यानंतर भंगले होते. पण अलमाटी येथे झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेत राष्ट्रीय चॅम्पियन संदीप सिंग मानकडून निराशाजनक कामगिरी झाल्याने राष्ट्रीय फेडरेशनने धनकरला आणखी एक संधी देण्यासाठी सोफिया स्पर्धेसाठी निवडले आहे. चाचणीत त्याने दुसरे स्थान मिळविले होते. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्याची जगभरातील मल्लांना ही शेवटची संधी असणार आहे.
या स्पर्धेत सात ऑलिम्पिक पदकविजेते वेगवेगळय़ा गटात खेळताना दिसणार आहेत. अंतिम फेरी गाठणाऱया मल्लांना ऑलिम्पिक पात्रता मिळणार असल्याने या सुवर्णसंधीचा लाभ उठवण्याचा अमित धनकर निश्चितच प्रयत्न करणार आहे. मात्र 74 किलो गटातील त्याचा प्रवास बराचसा कठीण असणार आहे. या गटात एकूण 36 मल्लांनी भाग घेतला असून त्यात तुर्कीचा सोनेर देमिरतास, सर्बियाचा वर्ल्ड चॅम्पियन हेटिक कॅबोलोव्ह, स्लोव्हाकियाचा युरोपियन चॅम्पियन तजमुराझ सल्काझानोव्ह यांचा समावेश आहे. याशिवाय नायजेरियाचा आफ्रिकन चॅम्पियन ओगबोना जॉन, किर्गीझस्तानचा आशियाई चॅम्पियन अर्सलान बुडाझापोव्ह, बेलारुसचा युरोपियन चॅम्पियन मोहमदखबिब के. यांचे आव्हानही असणार आहे. धनकर मॅटवर चपळ खेळतो, पण त्याचे प्रतिस्पर्धी कौशल्यपूर्ण खेळ करतात आणि यामुळेच फरक पडण्याची शक्यता आहे.
या स्पर्धेत खेळणाऱया भारताच्या अन्य फ्रीस्टाईल मल्लांत सुमित मलिक (125 किलो), सत्यवर्त कादियन (97 किलो) यांचा समावेश आहे. मलिकला अलमाटीत संधी मिळाली होती. पण त्याला त्याचा लाभ घेता आला नाही.
महिलांमध्ये सीमा बिस्ला (50 किलो गट) भारताची सर्वोत्तम मल्ल आहे. विनेश फोगट 53 किलो गटातून खेळायला सुरुवात केल्यानंतर सीमाने आश्वासक प्रदर्शन केले आहे. अलीकडेच झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिने कांस्यपदक मिळविल्याने तिचे मनोबल उंचावलेले आहे. निशा (68 किलो), पूजा (76 किलो) यांनी वरिष्ठ गटात नुकतीच सुरुवात केली आहे.
ग्रीको रोमन प्रकारात गुरप्रीत सिंग (77 किलो), सचिन राणा (60 किलो), आशू (6ाdन7 किलो), सुनील (87 किलो), दीपांशू (97 किलो), नवीन कुमार (130 किलो) भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. भारताच्या सहा मल्लांनी आतापर्यंत ऑलिम्पिक पात्रता मिळविली असून त्यात बजरंग पुनिया (6ग्न5 किलो), दीपक पुनिया (86 किलो) तर महिलांत विनेश फोगट (53 किलो), अन्शू मलिक (57 किलो), सोनम मलिक (62 किलो) यांचा त्यात समावेश आहे.