ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताला पहिल्या टप्प्यातील S-400 अॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम रशिया या वर्षाअखेरीस पुरवणार आहे.
रशिया S-400 हे मिसाईल 2021 पर्यंत भारताला देण्यात येणार होते. मात्र, भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया हे मिसाईल चालू वर्षाअखेरीस भारताला देणार आहे. तसे झाल्यास भारत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये S-400 सहभागी करू शकेल. दोन दिवसांपूर्वीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाच्या उपपंतप्रधानांशी यासंदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील S-400 देण्यास रशियाने सहमती दर्शवली आहे.
S-400 हे मिसाईल शत्रूच्या विमानांचा आणि क्षेपणास्त्रांचा सामना करण्यासाठी वापरले जाईल. 2018 मध्ये भारत आणि रशियादरम्यान जगातील सर्वात प्रगत हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा S-400 साठी 5 अब्ज डॉलर्सचा करार करण्यात आला होता.