नूतन कार्यकारिणीबरोबरच सभासदांनी व्यक्त केले समाधान
प्रतिनिधी/ बेळगाव
सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक बेकायदेशीर आहे. कार्यकारिणीची निवड चुकीच्या पद्धतीने झाली असून ती रद्द करावी, अशी याचिका वाचनालय बचाव समितीने मुख्य जिल्हासत्र न्यायालयामध्ये दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून वाचनालय बचाव समितीला चांगलाच दणका दिला आहे.
बचाव समितीने यावेळी न्यायालयात जी याचिका दाखल केली होती, त्यामधील मुद्दे योग्य नाहीत. तसेच ते मुद्दे या याचिकेला पुरक नाहीत. त्यामुळे ही याचिका फेटाळत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. वाचनालय बचाव समितीने कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन कार्यकारीणीवर टिकास्त्र केले होते. आता या वाचनालयावर जणू कर्नाटकचे प्रशासकच नियुक्त होणार असा आव आणला होता. मात्र तो न्यायालयाने फेटाळला असल्यामुळे कार्यकारिणीने त्याचे स्वागत केले आहे.
कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा घटनाबाह्य कारभार या निवडणुकीमध्ये झाला नव्हता. घटनेनुसारच ही निवडणूक झाली आहे. त्याबाबत रितसर ठराव करुन ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली होती. तसेच कार्यकारिणीची निवड घटनेनुसारच झाली. असे असताना या वाचनालयाच्या कार्यकारिणी विरोधात निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे, ऍड. नागेश सातेरी, कॉ. कृष्णा शहापूरकर आणि अनंत जाधव यांनी ही याचिका दाखल केली होती.
वाचनालयच्या विद्यमान कार्यकारिणीच्यावतीने निवडणूक प्रक्रियेची सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर केली होती. याचबरोबर ऍड. एस. जी. गणचारी, ऍड. विश्राम देशपांडे आणि ऍड. एन. डी. कुण्णे यांनी न्यायाधीश सी. एम. जोशी यांच्या समोर ठोसपणे बाजू मांडली. त्यानंतर न्यायाधीश सी. एम. जोशी यांनी त्यांचे म्हणणे एकूण बचाव समितीचा दावाच फेटाळला आहे. यामुळे जनतेतून तसेच अजिव सभासदांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या निकालाचे आम्ही स्वागत करतो-अध्यक्षा सुनिता मोहीते 12 डीआय 52
वाचनालयाची निवडणूक ही घटनेला धरुन झाली होती. कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर कृत्य आम्ही केले नाही. नियमानुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली असल्यामुळे न्यायालयाने आमची बाजु ग्राह्य धरली. याबद्दल आम्ही समाधानी आहे. वाचनालयाच्या कारभारामध्ये आजपर्यंत पारदर्शकपणा ठेवलेला आहे. पुढेही तसाच ठेवला जाईल. न्यायालयाने दिलेल्या या निकालाचे आम्ही स्वागत करत असल्याचे अध्यक्षा सुनिता मोहीते यांनी यावेळी सांगितले.