प्रस्थापितांना फटका बसणार : खाणपट्टय़ातील मतदान सरकारसाठी नकारात्मक.मगोचे किमान पाच उमेदवार जिंकण्याची शक्यता,कोणालाच स्पष्ट बहुमताची शक्यता नसल्याने चढाओढीला सुरुवात
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात मोठय़ा प्रमाणात झालेले मतदान हे नेमके कोणाच्या फायद्याचे? याबाबत अद्याप सस्पेन्स आहे. मात्र बहुतेक मतदारसंघातून मिळालेल्या माहितीनुसार दिग्गजांना तसेच प्रस्थापितांना त्याचा फार मोठा धक्का बसणार आहे व बसलेला आहे. प्राप्त माहितीनुसार, निम्म्या मंत्रिमंडळाला त्याचा फटका बसलेला आहे.
येत्या 10 मार्च रोजी मतमोजणी पणजी आणि मडगाव येथे एकाचवेळी हाती घेतली जाणार आहे. खाण क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात झालेले मतदान हे सरकारच्या विरोधात गेलेले आहे. राज्यातील खाण व्यवसाय गेली 10 वर्षे बंद आहे व तो सुरु करण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने जनतेने खाणपट्टय़ातील बहुतेक सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना मोकळे केलेले आहे. खाण क्षेत्रातील जनतेने मोठय़ा प्रमाणात बाहेर येऊन मतदान केलेले आहे. हे मतदान सरकारसाठी नकारात्मक आहे, असे तेथील जनतेने सांगितले.
राज्यातील एकंदर स्थिती पाहता भाजपला सरकार स्थापन करणे एक फार मोठे आव्हान बनले आहे. 10 मार्च रोजीच वस्तुस्थिती स्पष्ट होईल. परंतु मोठय़ा प्रमाणात महिला मतदारांनी केलेले मतदान हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे व सरकार नेमके कोणाचे? याबाबत राज्यात सस्पेन्स वाढलेला आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही नेत्यांनी मगोशी संपर्क साधलेला आहे. मगो पक्ष या निवडणुकीत उत्तम कामगिरी बजावलेला पक्ष ठरणार आहे. किमान पाच सदस्य निवडून येण्याची शक्यता पक्षाच्या एका नेत्याने व्यक्त केली.
काँग्रेस भाजप यांच्यात चढाओढ
या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला नेमक्या किती जागा मिळणार? याबाबत विविध तर्कवितर्क करण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी किमान 19 जागा पक्षाला मिळतील, असा अंदाज व्यक्त केलेला आहे. गोव्यात पुन्हा काँग्रेस पक्षच सरकार स्थापन करील असे ते म्हणाले. राज्यात काँग्रेस किंवा भाजप या दोन पक्षाव्यतिरिक्त कोणालाही सरकार स्थापन करता येणार नाही. कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने सरकार नेमके कोण स्थापन करणार? याबाबत आतापासूनच उहापोह सुरु झालेला आहे.
काँग्रेस कोणत्याही तडजोडीला तयार
भाजपला सत्तेवर जाण्यापासून रोखण्यासाठी यावेळी काँग्रेस पक्षाने कोणतीही तडजोड करण्याची तयारी दर्शविली आहे. भाजप मात्र केवळ भाजपचा आमदारच राज्याचा मुख्यमंत्री होईल या गोष्टीवर ठाम राहणार आहे. राज्यात निवडून येणाऱया काही अपक्षांवर भाजपचा डोळा आहे. भाजपला आपले संख्याबळ 17 ते 19 या दरम्यान पोहोचेल असे वाटते. अशा परिस्थितीत काहींच्या मते मगो नेते सुदिन ढवळीकर यांना तसेच त्यांच्या पक्षाला सत्तेत सहभागी करुन घ्यावे असे वाटते. मगो आणि तृणमूल काँग्रेस यांच्या दरम्यानचे संबंध सध्या नाजूक आहेत त्यामुळे मगो तृणमूलची साथ सोडणार, अशी चिन्हे दिसत आहेत.
शरद पवार करणार मध्यस्थी?
प्राप्त माहितीनुसार, गोव्यातील काही विरोधी नेत्यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला आहे. गोव्यातही महाराष्ट्राच्या धर्तीवर महाविकास आघाडी स्थापन व्हावी व त्यातून भाजपला सत्तेवर जाण्यापासून रोखता यावे यासाठी प्रयत्न केले जातील. शरद पवार हे नेमकी कोणती भूमिका गोव्याच्या राजकारणात बजावतील हे पुढील आठवडय़ात निश्चित होईल. मागील निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्ष बेसावध होता. यावेळी मात्र काँग्रेसने अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे ठरविले आहे.
खाणपट्टय़ात सरकार विरोधी मतदानाचे संकेत
खाणपट्टय़ातील विविध मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 80 टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाले असून खाणी सुरू होत नसल्याच्या निषेधार्थ आणि राग म्हणून तेथील मतदारांनी सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात मतदान केल्याचे संकेत मिळत आहेत. मये-84.33, डिचोली-87.84, सांखळी-89.64, सावर्डे-84.61, सांगे-82.11, केपे-83.45, कुडचडे-80.29 अशा टक्केवारीने या मतदारसंघात मतदान केल्याची नोंद झाली आहे.
तिसवाडी, बार्देश, सालसेत तालुक्यातील विविध मतदारसंघात त्या तुलनेत कमी म्हणजे 70 ते 80 टक्क्यांच्या मध्ये मतदान झाले आहे. खाणपट्टय़ातील वाढीव मतदान कोणाच्या फायद्याचे किंवा किंवा नुकसानीचे ते 10 मार्च रोजी कळणार आहे. तिसवाडीतील मतदानाची टक्केवारी 73 ते 77 च्या दरम्यान असून ती 80 टक्क्याच्या पुढे गेलेली नाही. पणजी-73.75, ताळगाव-75.38, सांताक्रूझ-73.97, सांतआंद्रे-72.85, कुंभारजुवे-77.65 या तिसवाडीच्या 5 मतदारसंघातील टक्केवारी वाढली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बार्देशमध्येही तीच परिस्थिती असून सर्व मतदारसंघातील टक्केवारी 80 च्या खालीच राहिली आहे. हळदोणा-75, पर्वरी-75, कळंगूट-77, साळगाव-77, शिवोली-79, म्हापसा-77.43, थिवी-80 अशी टक्केवारी राहिली आहे. सालसेतमध्येही मतदानाची टक्केवारी 77 च्या खाली असल्याचे समोर आले आहे. कुडतरी-72.41, फातोर्डा-76.69, मडगाव-74.84, बाणावली-70, नावेली-72, कुंकळ्ळी-76, वेळ्ळी-72.41, नुवे-76.