गोवा शिक्षण मंडळाचीही होणार चौकशी
प्रतिनिधी / पणजी
दहावीच्या परीक्षेतील इंग्रजी प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेल्या वादग्रस्त प्रश्नांबाबत सरकारने एकूण चार शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या असून त्यांना स्पष्टीकरण देण्याची सूचना केली आहे. या प्रकरणी गोवा बोर्डाची देखील छाननी करण्यात येणार असून उच्चस्तरीय अधिकाऱयांकडे हा विषय चौकशीसाठी सोपविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
इंग्रजीची प्रश्नपत्रिका तयार केलेल्या सदर शिक्षकांना नोटीस पाठवून त्या प्रश्नांसंदर्भात त्वरित स्पष्टीकरण देण्यास बजावण्यात आले आहे. दहावी परीक्षा संपण्यापूर्वी काय तो खुलासा करावा, असे त्यांना नोटीसीतून सूचित करण्यात आले आहे. परीक्षा संपल्यानंतर आणि त्या चार शिक्षकांचे उत्तर आल्यानंतर कारवाईचा पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी संबंधित चार शिक्षकांसहित गोवा बोर्डावरही सरकारची संशयाची सुई फिरत असून बोर्डातील काहीजणांची चौकशी होणार असल्याचे सुत्रांनी नमूद केले. असे वादग्रस्त प्रश्न परीक्षेत समाविष्ट करण्यामागे बोर्डातील काही जणांचा हेतू असू शकतो, असे सरकारचे मत बनले असून शिक्षकांसोबत बोर्डही संशयाच्या घेऱयात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. सरकारमधील व शिक्षण खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱयांकडे हे चौकशीचे काम देण्यात आले असून त्याचा अहवाल शिक्षणमंत्री अर्थात सरकारला सादर केल्यानंतरच पुढे काय करायचे याचा निर्णय होणार असल्याचे सुत्रांनी नमूद केले.