घुणकी/प्रतिनिधी
पुणे बंगळूर महामार्गावरील कणेगाव– घुणकी दरम्यान वारणा नदीच्या पुलानजीक टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टेम्पो नदीच्या भरावात सुमारे शंभर फूट खाली कोसळला. सुदैवाने टेम्पो झाडाला धडकल्याने चालक स्टेअरींग व झाडाच्या फांदीत अडकला. भाऊ सिताराम झरे (वय.५५ रा.पाटण, जि. सातारा) असे चालकाचे नाव आहे. ही घटना आज, मंगळवारी (दि.4) सकाळच्या सुमारास घडली. टेम्पो चालकाला बाहेर काढण्यासाठी नागरिकांचे प्रयत्न सुरू होते.
पुण्याहून आयशेर टेम्पो क्रमांक (एम.एच.११–ए.एल.-०२२८) कोल्हापूरकडे भरधाव वेगाने चालला होता. वारणा नदीच्या पूर्वस चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने सुमारे शंभर फूट भरावात जाऊन झाडावर जाऊन आदळला. यामुळे झाड आणि टेम्पो मध्ये चालकाचे पाय अडकले. चालकाचा आरडाओरडा ऐकून सुरवातीस अन्य वाहनातील प्रवाशी मदतीस धावले. मात्र चालकाचे पाय स्टेअरिंग व झाडात अडकल्याने निघाला नाही. झाड आणि टेम्पो प्रवाशासह नागरीकांनी दिड तासाहून अधिक काळ शर्थीचे प्रयत्न सुरू होते. पण टेम्पो झाडात घुसल्याने चालक निघाला नाही. त्यानंतर ट्रँक्टरच्या सहाय्याने चालकाला काढण्याचा प्रयत्न झाला पण तोही असफल झाला. बाराच्या सुमारास गँस कटर व क्रेनच्या सहाय्याने चालकाला काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ही घटना पाहणासाठी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
घटनास्थळी १०८ चे प्रशांत ठाणेकर, पायलट भागवत कांबळे, हायवे पेट्रोलियमचे कर्मचारी उपस्थित होते. मात्र उशीरा पर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते.