परब यांनी आंबेगावासाठी दिलेले योगदान आंबेगाववासियांच्या कायम स्मरणात राहणार
ओटवणे प्रतिनिधी:
वासुदेव परब यांनी धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सहकार व क्रीडा क्षेत्रात दीपस्तंभाप्रमाणे कार्य केले. आंबेगावासाठी त्यांचे हे योगदान आंबेगाव वासियांच्या कायम स्मरणात राहणार असून त्यांचे हे कार्य पुढे सुरू ठेवणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन आंबेगाव माजी सरपंच नामदेव परब यांनी केले. आंबेगाव येथील माजी सरपंच कै. वासुदेव परब यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आंबेगाव वासियांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात नामदेव परब बोलत होते. यावेळी देवस्थान मानकरी तथा वासुदेव परब यांचे बंधू ज्ञानेश्वर परब, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम राऊळ, अशोक शिंदे, विलास राणे, प्रदीप परब, अण्णा केळुसकर, योगेश गवळी, दाजी तेली, बाळकृष्ण गवळी, संतोष राणे, बाबुराव सावंत, भिवाजी नाईक, शशिकांत परब, सखाराम कुंभार, गणेश कुंभार, विलास सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कै वासुदेव परब यांच्या सामाजिक कार्याची आठवण म्हणून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील प्रत्येक कुटुंबाला गणेश पूजा सामानाचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनीही कै. वासुदेव परब यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.