जीवे मारण्याची धमकी, मुंबईच्या चौघांचे कृत्य, तिघांना अटक
प्रतिनिधी/वास्को
हॉटेलचा ग्राहक म्हणून वास्तव्य करून ओळख वाढवून हॉटेल मालकालाच खोलीत बांधून लुटण्याचा प्रयत्न मुंबईतील चौघांनी वास्कोतील आल्त दाबोळी भागात केला. मात्र, या घरमालकाच्या कर्मचाऱयाच्या सतर्कतेमुळे मालकाचा जीव वाचला. 1 लाख 20 वीस हजारांचा ऐवज त्यांनी लुटला. परंतु चौघापैकी तिघांना गजाआड करण्यातही पोलिसांना यश आले. लुटलेला ऐवजही हस्तगत करण्यात आला. ही घटना शुक्रवारी दिवसा ढवळय़ा घडली. पोलिसांनी अटक केलेल्या संशयीत आरोपींची नावे संजय वर्मा, सुरज मारूती कांबळी, विशाल अहुजा व सुनिल मोरे असे असून हे सर्वजण महाराष्ट्रातील उल्हासनगर ठाणे भागातील आहेत. संजय वर्मा हा या घटनेतील म्होरक्या असून तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
दाबोळीत राहणारे व वास्कोतील एका उद्योजक प्रमोद देसाई यांच्यावर हा प्रसंग गुदरला. काही दिवसांपूर्वीच दाबोळीतील त्यांच्या हॉटेलमध्ये पाहुणे बनून व्यवसायाने आयुवेर्दीक डॉक्टर म्हणवणारा संजय वर्मा हा युवक दाखल झाला होता. त्यामुळे मालक प्रमोद देसाई व त्या युवकांमध्ये ओळख झाली होती. त्यांनी देसाई यांच्याशी सलगी वाढवून त्यांच्याकडून वीज हजार रूपये उसने घेतले होते. त्या बदल्यात त्याने दिलेला धनादेश वटला नव्हता. त्यामुळे देसाई यांच्या कर्मचाऱयाला त्याच्याबद्दल संशय आला होता. मात्र, तो खोली सोडून गेला होता. त्यामुळे त्या पैशांची आशाही त्यांनी सोडली होती.
बांधून घालून एक कोटीची केली मागणी
परंतु शुक्रवारी सकाळी संजय वर्मा याने देसाई यांना फोन करून घरात कोण आहे नाही याची विचारपुस केली. हॉटेलपासून काही अंतरावरच त्यांचा बंगला आहे. अवघ्याच काही वेळाने इतर तिघा युवकांसोबत तो त्यांच्या घरात आला. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्याचे निमित्त करून त्यांना एका खोलीत पाय बांधून ठेवले व त्यांच्याकडे 1 कोटी रूपयांची मागणी केली. ऐवढे पैसे आपल्याकडे नसल्याचे देसाई यांनी सांगताच त्यांच्यावर दमदाटी करण्यात आली. जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी घरात सर्वत्र ऐवज शोधला. एक मोबाईल फोन, 5 मनगटी घडय़ाळे व 7 हजारांची रोख मिळून 1 लाख 20 हजारांचा ऐवज त्यांच्या हाती लागला. मात्र, तेवढय़ाने समाधान न झाल्याने त्यांनी घरमालक देसाई यांच्याकडून काही लाखांचे चार धनादेश सही करून घेतले. त्यानंतर तिघेजण ते धनादेश वटवण्यासाठी बाहेर पडले. तर सुनिल मोरे हा एकटा आरोपी त्या खोलीत धनादेश वटण्याची प्रतिक्षा करीत देसाई यांना धाक दाखवत राहिला.
सतर्क कर्मचाऱयामुळे मालकाचा जीव वाचला
या दरम्यान, देसाई यांचा एक कर्मचारी घराजवळ आला व मालकाची चौकशी करू लागला असता, घरात थांबलेल्या आरोपीने मालक बैठकीमध्ये व्यस्त असल्याचे सांगून नंतर येण्यास सांगितले. बैठकीचा दावा त्या कर्मचाऱयाला संशयास्पद वाटला. त्यामुळे त्याने दूर जाऊन मालकाला फोन लावला. त्या फोनवर आपण बैठकीमध्ये असल्याचे सांगण्यास आरोपीने देसाई यांना भाग पाडले. परंतु दुसऱयांदा त्या कर्मचाऱयाने फोन केला असता. मालकांचा फोन बंद असल्याचे दिसून आल्याने कर्मचाऱयाचा संशय बळावला. त्याने इतर कर्मचाऱयांना गोळा करून पुन्हा मालकांच्या बंगल्याजवळ धाव घेतली व तीथे थांबलेल्या आरोपीला पकडून ठेवले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
घटनास्थळी एकाला तर तिघांना पणजीत अटक
पोलिसांनी या घटनेची प्राथमीक माहिती मिळवून त्या तिघा चोरटय़ांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. संध्याकाळपासून पहाटेपर्यंत झालेल्या शोध कार्यात अन्य दोघांना गजाआड करण्यास पोलिसांना यश आले. मारूती कांबळी याला पणजीतील बसस्थानकावरून मुंबईला निघण्याच्या प्रयत्नात असताना ताब्यात घेण्यात आले. तर त्याच्याचकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विशाल अहुजा याला पणजीतीलच एका कॅसिनोमध्ये ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरीचा ऐवजही हस्तगत करण्यात आला आहे. मात्र, या टोळीचा म्होरक्या डॉ. संजय वर्मा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस निरीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को पोलीस अधिक तपास करीत आहेत.