प्रतिनिधी /पणजी
वास्को रेसिडेंसी येथे राजस्थान ग्रामीण मेळ्य़ाचे आयोजन केले असून या अंतर्गत प्रदर्शन तथा विक्री सुरु झाली आहे आणि जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
एम. व्ही. हँडिक्राफ्टसतर्फे या प्रदर्शन तथा विक्रीचे आयोजन करण्यात आलेले आहे व त्यात देशातील विशेषतः पूर्ण भारतातील ग्रामीण भागातील हस्तकारागिर तसेच ग्रामीण कलाकारांनी बनविलेली वस्त्रे, हँडलूम, हस्तकला, विविध प्रकारचे दागिने, सिल्क साडय़ांची देखील विक्री करण्यात येत आहे. बंगाल, ओडिसा मधील ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या सिल्क साडय़ाही प्रदर्शनात विक्रीस मांडलेल्या आहेत.
या व्यतिरिक्त लाकडी कोरीव वस्तू, उत्तर प्रदेशच्या कारागिरांनी बनविलेल्या वस्तू, राजस्थानी मार्बल आणि विविध प्रकारच्या दगडांवरील कोरीव कामे तसेच साडय़ा, मुलींचे विविध प्रकारचे ड्रेस व ड्रेस मटेरियल्स याशिवाय विविध प्रकारच्या भेट वस्तुंचीही विक्री करण्यात येत आहे. या प्रदर्शनात तागापासून बनविलेल्या विविध प्रकारच्या बॅगा तसेच वस्तुही विक्री तथा प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या आहेत. वास्को येथील वास्को रेसिडेंन्सी मध्ये हे प्रदर्शन दि. 16 जानेवारीपर्यंत चालेल असे आयोजकांनी कळविले आहे.