बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव-वास्को द गामा दरम्यान धावणारी (रेल्वे क्र. 06921-22) रेल्वे आता जूनपर्यंत धावणार आहे. रेल्वे विभागाने प्रायोगिक तत्त्वावर ही द्विसाप्ताहिक रेल्वे सुरू केली होती. यामुळे वास्कोच्या प्रवाशांना दुपारपर्यंत बेळगावमध्ये येता येत होते. या रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने ही रेल्वे आता जून महिन्यापर्यंत या मार्गावरून धावणार आहे.
ही रेल्वे द्विसाप्ताहिक असून दर शुक्रवारी व शनिवारी बेळगाव-वास्को दरम्यान धावते. बेळगाव येथून शुक्रवारी व शनिवारी दुपारी 12.30 वा. ही पॅसेंजर सुटते. देसूर, खानापूर, गुंजी, लोंढा, तिनईघाट, कॅसलरॉक, दूधसागर, कुळे, मडगाव, दाभोळी असे थांबे घेत सायंकाळी 6.20 वा. वास्कोला पोहचते. शुक्रवारी व शनिवारी वास्को येथून सकाळी 6.20 वा. सुटणारी ही रेल्वे सकाळी 11.20 वा. बेळगावला पोहचते.
रेल्वे विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार ही रेल्वे 21 मार्चपर्यंत धावणार होती. परंतु प्रवाशांनी मागणी केल्यामुळे ही रेल्वे आता 27 जूनपर्यंत या मार्गावर धावणार आहे. पूर्वीप्रमाणेच वेळापत्रकानुसार ही रेल्वे धावणार असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले आहे. सध्या बेळगाववरून वास्कोला जाण्याकरिता गोवा एक्स्प्रेस व वास्को-बेळगाव या दोन रेल्वे उपलब्ध आहेत.
चुकीच्या वेळापत्रकामुळे प्रवाशांमध्ये घट
बेळगाव आणि गोव्याचा अतिशय जवळचा संबंध आहे. त्यामुळे व्यापार, पर्यटन यासाठी दररोज शेकडो प्रवासी बेळगाव-गोवा असा प्रवास करीत असतात. रेल्वे विभागाने द्विसाप्ताहिक रेल्वे सुरू केली असली तरी चुकीच्या वेळापत्रकामुळे तिला तितकासा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळेच या रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.