प्रतिनिधी/ वास्को
वास्को शहरातील स्वातंत्र्यपथ मार्गावर डांबरीकरणानंतर डांबराचे थर निर्माण झाल्याने धोका निर्माण झालेला आहे. हे डांबराचे थर त्वरीत हटवण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
वास्को शहरातील रस्त्यांचे नुकतेच डांबरीकरण झालेले आहे. या रस्त्यांवर सध्या पांढऱ्या पट्ट्या आखण्यात येत आहेत. रस्ते सुशोभीत करण्यात येत आहेत. मात्र, शहरातील स्वातंत्र्यपथ मार्गावर सध्या भलतीच समस्या उभी राहिलेली आहे. काही ठिकाणी आणि विशेषता पालिका उद्यानासमोरील रस्त्यावर डांबराचे थर निर्माण झालेले आहेत. डांबरीकरणापासूनच ही समस्या दिसत आहे. हल्ली कडक उन्ह पडत असल्याने ही समस्या अधिकच गंभीर बनलेली आहे. रस्त्यावर काही ठिकाणी एकवटलेले डांबर सध्याच्या उन्हामुळे वितळत असून ते वाहन चालकांसाठी धोक्याचे ठरणारे आहे. चिकटणाऱ्या डांबरावरून वाहने हाकली जात असल्याने वाहनांच्या टायरना झळ बसू शकते. वाहनांवरील नियंत्रण जाऊन अपघाताच्या घटना घडू शकतात. हा धोका लक्षात घेऊन रस्त्यावर निर्माण झालेले डांबराचे थर त्वरीत हटवण्याची आवश्यकता व्यक्त होऊ लागलेली आहे.