बेंगळूर-निजामुद्दीन रेल्वे आजपासून धावणार
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणारी वास्को-हजरत निजामुद्दीन ‘गोवा एक्स्प्रेस’ सोमवारपासून पूर्ववत झाली. सोमवारी वास्को येथून ही रेल्वे निघून बेळगावमार्गे हजरत निजामुद्दीनच्या दिशेने रवाना झाली आहे. दररोज धावणारी ही रेल्वे गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, दिल्ली येथील प्रवाशांना सोयीची ठरणार आहे.
सोमवारी दुपारी 3 वाजता वास्को येथून ही रेल्वे मार्गस्थ झाली. मडगाव, कोलेम, कॅसलरॉक, लोंढामार्गे रात्री 7.45 वा. बेळगावमध्ये पोहोचली. त्यानंतर घटप्रभा, रायबाग, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, खारडा, इटारसी, भोपाळ, झांशी, ग्वालियर, आग्रा, मथुरेवरून तिसऱया दिवशी सकाळी 6.20 वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचणार आहे.
बुधवार दि. 3 जून रोजी दुपारी 1 वाजता हजरत निजामुद्दीन येथून ही रेल्वे मार्गस्थ होणार आहे. परतीच्या प्रवासात सर्व रेल्वे स्थानकांवर थांबत रात्री 12.45 वा. बेळगावला पोहोचणार आहे. 5 मिनिटांच्या थांब्यानंतर ही रेल्वे वास्कोच्या दिशेने रवाना होणार आहे. सकाळी 6.45 वा. वास्को-द-गामा रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे, अशी माहिती नैर्त्रुत्य रेल्वेकडून देण्यात आली.
आजपासून धावणार यशवंतपूर-निजामुद्दीन रेल्वे
बेंगळूर (यशवंतपूर)-हजरत निजामुद्दीन या मार्गावर मंगळवारपासून रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे दर मंगळवार व गुरुवारी बेंगळूर येथून तर बुधवार व शुक्रवारी हजरत निजामुद्दीन येथून सुटणार आहे. दि. 2 जूनपासून दुपारी 1 वाजून 55 मि. यशवंतपूर येथून ही रेल्वे रात्री 12 वाजून 31 मिनिटांनी बेळगावला पोहोचणार आहे. त्यानंतर मिरज, पुणे, मनमाड, भुसावळ, भोपाळ, झाशीमार्गे निजामुद्दीनला पोहोचणार आहे. दि. 5 जूनपासून पुन्हा बेळगावमार्गे बेंगळूरला परतणार असल्याचे कळविण्यात आले आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने 1 जूनपासून 16 रेल्वे सुरू केल्या आहेत. त्यामध्ये बेंगळूर ते हुबळी, मुंबई ते गदग, यशवंतपूर ते हजरत निजामुद्दीन व वास्को ते निजामुद्दीन या रेल्वेंचा समावेश आहे. या रेल्वेंमुळे कर्नाटक व उत्तर भारतातील नागरिकांना प्रवास करणे सोपे होणार आहे. यातील दोन रेल्वे या बेळगावमार्गे धावणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.