वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीमध्ये चांगली सुधारणा झाली असल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भातला अहवाल फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने नुकताच सादर केला आहे. सदरच्या अहवालात वरील माहिती दिली गेली आहे. महिन्याच्या तुलनेत पाहता सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये ही वाढ 11 टक्के इतकी नोंदली गेली आहे.
पण वर्षाच्या तुलनेत पाहता मात्र 10.24 टक्के इतकी नोंदणीत घट झाली आहे. यातील विविध वाहनांचा आढावा घेतल्यास दुचाकींची नोंदणी 12 टक्के, तिचाकींची 58 टक्के आणि व्यावसायिक वाहन नोंदणी वर्षाच्या तुलनेत 36 टक्के इतकी घटली आहे. दुसरीकडे प्रवासी वाहन नोंदणी 9.8 टक्के वाढली असल्याचे दिसून आले आहे. ट्रक्टर नोंदणीनेही 80 टक्के इतकी भरभक्कम वाढ दर्शवली आहे. यंदा मान्सून सर्वत्र चांगला झाल्याने शेतपिकांना हा पाऊस उपयुक्त ठरला असून ट्रक्टर्सची मागणी शेतकऱयांकडून वाढली आहे.