1971 च्या युद्धातील नायक फील्ड मार्शल माणेकशॉ यांचा बायोपिक
भारताच्या युद्धनायकांमध्ये फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी सॅम माणेकशॉ यांनी अफाट नेतृत्वक्षमता दाखवून देत पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते आणि बांगलादेश नावाचा नवा देश जगाच्या नकाशावर आला होता. सॅम माणेकशॉ यांच्यावर बायोपिक तयार केला जात असून यात विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.
माणेकशॉ यांच्या जन्मदिनी या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाला ‘सॅम बहादुर’ नाव देण्यात आले आहे. 1971 चे युद्ध जिंकल्यावर फील्डमार्शल माणेकशॉ यांना याच नावाने संबोधिले जात होते. त्यांनी स्वतःच्या 40 वर्षांच्या सैन्य कारकीर्दीत 5 युद्धांमध्ये भाग घेतला होता. फील्ड मार्शलपदी बढती मिळणारे ते भारतीय सैन्याचे पहिले अधिकारी होते.
आमच्या पालकांकडून सॅम बहादुर यांच्या गोष्टी ऐकल्या होत्या, पण या चित्रपटाची पटकथा वाचल्यावर भानच हरपले. सॅम एक नायक आणि देशभक्त होते. त्यांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारणे गौरवास्पद बाब असल्याचे उद्गार विकी कौशलने काढले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत.