अयोध्यानगरात 6 लाखाची घरफोडी
प्रतिनिधी /बेळगाव
अयोध्यानगर येथील ऋतुराज अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये चोरीची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी घरातील मंडळी मॉर्निंग वॉकला गेलेली असताना ही घटना घडली आहे. मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. विकेंड कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र नाकेबंदी करून पोलीस तैनात केले असतानाही चोरटय़ांनी मात्र निर्धास्तपणे आपला कार्यभाग उरकला आहे.
ऍड. दयानंद सोमशेखर पचंडी यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. ते शनिवारी सकाळी 7.45 वाजता आपल्या
फ्लॅटला कुलूप लावून मॉर्निंग वॉकला गेले होते. तासाभरात 8.45 वाजता ते घरी परतले, त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरटय़ांनी सुमारे 6 लाख 30 हजाराचा ऐवज पळविला आहे.
चोरटय़ांनी 12 तोळय़ांचे दागिने, 30 हजार रुपये रोख रक्कम, 12 रेशमी साडय़ा पळविल्या आहेत. चोरटय़ांनी फ्लॅटचा कुलूप तोडून घरात प्रवेश केला आहे. घटनेची माहिती समजताच चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. रविवारी मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगेरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. विकेंड कर्फ्यूत सर्वत्र शुकशुकाट असताना घडलेल्या या चोरीच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे.