देशात ‘योग दिनी’ 81 लाख जणांना दिली लस -लाभार्थी-कोरोनायोद्धय़ांचे पंतप्रधानांनी केले कौतुक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील लसीकरणाला व्यापक स्वरुप प्राप्त करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार ‘योग दिना’चे औचित्य साधत लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली. मोहिमेच्या नव्या टप्प्यात पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी देशात विक्रमी लसीकरणाची नोंद झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सायंकाळपर्यंत तब्बल कोरोना लसींचे 81 लाखाहून अधिक डोस दिले गेल्याचे स्पष्ट झाले. ‘को-विन’ ऍपनुसार सायंकाळी 7 वाजेपर्यंत 80 लाख 96 हजार 417 इतक्या लाभार्थींची नोंद झाली होती. एकंदर हा लस लाभार्थींचा एका दिवसातील उच्चांकी आणि विक्रमी आकडा ठरला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विक्रमी लसीकरणाबाबत ‘वेलडन इंडिया’ असे म्हणत आनंद व्यक्त केला आहे.
केंद्र सरकार आता देशातील प्रत्येक नागरिकास मोफत लस देत आहे. मागील आठवडय़ातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवसापासून लसीकरणाची गती वेगवान झाली आहे. केंद्र सरकारने लस उत्पादनापैकी 75 टक्के लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर 25 टक्के लसी खासगी रुग्णालयांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापूर्वी राज्यांनाही लस खरेदी करण्यास सांगितले गेले होते. मात्र, आता केंद्र सरकार वैद्यकीय कंपन्यांकडून लसी खरेदी करून राज्यांना पुरवत आहे. सोमवारी सकाळपासूनच लसीकरण मोहीम जोरात सुरू झाली. त्यामुळेच संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 70 लाख डोस दिले गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोना साथीला देशात येऊन एक वर्षाहून अधिक कालावधी झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत साडेतीन लाखाहून अधिक लोक मरण पावले आहेत. यावषी जानेवारीत देशात लसीकरण मोहीम सुरू झाली. सुरुवातीच्या काळात, आरोग्य कर्मचारी आणि त्यानंतर आघाडीच्या कामगारांना लसीकरण दिल्यानंतर, वृद्धांना लस देणे सुरू केले. त्यानंतर 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लस दिल्यानंतर कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना लसी देण्याची घोषणा करण्यात आली. तथापि, आतापर्यंत राज्य सरकारला 18 ते 44 वयोगटातील लोकांना लसी द्यावी लागली होती. आतापासून केंद्राने लसींचा पुरवठा करण्याची सूत्रे आपल्या हातात घेतली असून राज्यातील कोरोनास्थिती आणि लोकसंख्येनुसार लसींचे डोस पुरविले जाणार आहेत.
वेलडन इंडिया !
लसीकरणाबाबत पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. “आजच्या रेकॉर्ड ब्रेकिंग लसीकरणाची संख्या आनंददायक आहे. कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी लस हे आपले सर्वात मजबूत शस्त्र राहिले आहे. ज्यांनी लसीकरण केले त्या सर्वांचे आणि तसेच सर्व नागरिकांनी लसीकरण केल्याची खात्री करून घेतलेल्या सर्व अग्रगण्य योद्धय़ांचे अभिनंदन. वेलडन इंडिया’’ असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.
आतापर्यंत 28 कोटी डोस
20 जूनपर्यंत देशभरात कोरोना लसीचे 28 कोटी डोस देण्यात आले आहेत. रविवारी दिवसभरात 30 लाख 39 हजार डोस देण्यात आले आहेत. तर आतापर्यंत 39 कोटी 24 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. रविवारी दिवसभरात जवळपास 14 लाख कोरोना चाचण्यांचे सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्मयांहून अधिक आहे.