चित्रिकरणाचे ठिकाण निश्चित
चालू वर्षात बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान अत्यंत व्यस्त आहे. अतरंगी रे चित्रपटातील अभिनयामुळे सध्या ती चर्चेत आहे. विक्की कौशलसोबत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या पुढील चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केल्यावर सारा लवकरच पवन कृपलानी यांच्या चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह तसेच विक्रांत मैसी देखील दिसून येणार आहेत.
या थ्रिलर चित्रपटाची निर्मिती रमेश तौरानी करत आहेत. चालू महिन्याच्या अखेरीस सारा, चित्रांगदा आणि विक्रांत हे गुजरातच्या राजकोट शहरात चित्रिकरण सुरू करणार आहेत. चित्रपटाच्या मोठय़ा हिस्स्याचे तेथेच चित्रिकरण होणार आहे. उर्वरित चित्रिकरण मुंबईत केले जाणार आहे.
साराने 27 जानेवारी रोजी विक्की कौशलसोबतच्या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. विक्की सर्वात विनम्र, प्रतिभावंत कलाकारांपैकी एक आहे. त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने स्वतःला सुदैवी समजते, त्याच्याकडून बरेच काही शिकता आल्याचे साराने म्हटले होते.