प्रतिनिधी/ निपाणी
विघ्न दूर करणारा म्हणून ओळखल्या जाणाऱया आद्यपूजक श्री गणरायाचे आगमन शनिवारी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर घरोघरी भक्तिमय वातावरण पहायला मिळत आहे. कोरोनाचे संकट सर्वत्र गडद होत चालले असले तरी हे विघ्नही लवकरच टळेल, असा विश्वास असल्याने गणेशभक्त लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत उत्साहाने गुंतले असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नद्या भरलेल्या होत्या. अशावेळी पावसाळय़ात महापुराचे संकट येण्याची भीती प्रशासनासह नागरिकांना होती. मात्र सुदैवाने महापुराचे विघ्न न आल्याने निपाणी तालुक्याला दिलासा मिळाला आहे. कोरोनाचे संकटही लवकरच जाऊ दे, असे साकडे विघ्नहर्त्या गणरायाला घातले जाणार आहे. गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर निपाणी बाजारपेठेत शुक्रवारी सजावट खरेदीसाठी तोबा गर्दी उसळल्याचे पहायला मिळाले. कोरोना फैलावामुळे यंदा प्रशासनाने नियम व अटी घालून सार्वजनिक गणेशोत्सवास परवानगी दिली आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेशमूर्ती 4 फुटांपर्यंत असणार आहे. मात्र मूर्ती छोटी असली तरी श्रद्धा मोठी असल्याचे गणेशपूजनातून पहायला मिळणार आहे. गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सजावट खरेदी साहित्य, फुले हार आदी खरेदीसाठी निपाणीत भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी मुहूर्त
शनिवारी सकाळी 8 ते 9 व 11 ते सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करावी तसेच 25 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते 3 तसेच सायंकाळी 5.32 ते रात्री 8.15 व गंगा आणण्यासाठी 26 ऑगस्ट रोजी सकाळी 6.20 ते 9.27 व 11 ते 12 वाजेपर्यंत मुहूर्त असल्याची माहिती दत्तात्रय जोशी-निपाणी यांनी दिली.