रात्रीच्यावेळी गैरप्रकार चालत असल्याची टीका : कचऱयासह जुन्या इमारतींचे साहित्य टाकल्याने दुर्गंधी, खुल्या जागेचा विकास करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका व्याप्तीमध्ये अनेक ठिकाणी खुल्या जागा आहेत. मात्र बहुतांश जागांचा दुरुपयोग होत असून विजयनगर सर्व्हे क्र. 189/ ए / ए मध्ये खुली जागा सोडली आहे. या जागेत विविध उपक्रम राबवून विकास करण्याऐवजी मातीचे ढिगारे टाकण्यात येत आहेत. या खुल्या जागेत अवैद्य प्रकार सुरू असून मनपाने याकडे लक्ष देऊन खुल्या जागेचा विकास करावा अशी मागणी शिवगिरी कॉलनी व सिंधी कॉलनी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
महापालिका आणि हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीवर असलेल्या खुल्या जागेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या जागेचा विनियोग कचरा टाकण्यासाठी होत आहे. या परिसरात कचरा तसेच जुन्या इमारतींचे साहित्य टाकण्यात आल्याने दुर्गंधी पसरली आहे. गवत, झाडे-झुडपे वाढल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे रहिवाशांना त्रास होत आहे. झाडा-झुडपांमुळे विषारी सापांचा उपद्रव वाढला आहे. तसेच डासांचा त्रास वाढल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. खुल्या जागेकडे मनपाने दुर्लक्ष केले असल्याने अतिक्रमणदेखील झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
आठ ते दहा एकर जागेचा दुरुपयोग केला जात असून काही तरुण मंडळी या ठिकाणी अवैद्य प्रकार करीत आहेत. या ठिकाणी मद्यपानाचा आणि धूम्रपानाचा अड्डा बनला आहे. रात्रीच्यावेळी या ठिकाणी गैरप्रकार चालत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. या जागेचा विकास करणे गरजेचे असून याठिकाणी चाललेल्या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांना नाहक त्रास होत आहे. महापालिकेने विविध ठिकाणी असलेल्या खुल्या जागांचा विकास केला आहे. मात्र प्रशस्त असलेल्या खुल्या जागेच्या विकासाकडे कानाडोळा केला आहे.
शिवगिरी कॉलनी, सिंधी कॉलनी, जनता कॉलनी, रक्षक कॉलनी, धन्वंतरी कॉलनी, पाईपलाईन रोड अशा विविध भागातील रहिवाशांसाठी ही जागा सोयीची असून चांगला उपक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी होत आहे. जागेमध्ये उद्यानाची निर्मिती करावी व जागेचा सदुपयोग करावा, अशी मागणी महापालिकेकडे सातत्याने केली होती. पण महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे येथे गैरप्रकार चालत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. सदर जागेचा विकास करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.