खिडकीचे गज कापून चोरटय़ांचा बंगल्यात प्रवेश : घरफोडय़ांच्या सत्राने परिसरात खळबळ : 500 ग्रॅम सोन्याचे दागिने पळविले
प्रतिनिधी / बेळगाव
विजयनगर पाठोपाठ जयनगर-हिंडलगा परिसरात घरफोडीचा प्रकार घडला आहे. खिडकीचे गज कापून चोरटय़ांनी 22 लाखांचा ऐवज पळविला आहे. या घटनेने उपनगरांत एकच खळबळ माजली असून पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
चोरटय़ांनी 500 ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन लाख रुपये रोकड पळविल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. जयनगर येथील श्रीधर परशराम सुलाखे (वय 28) यांच्या घरी चोरीचा हा प्रकार घडला आहे. बुधवारी रात्री उशीरा ही घटना उघडकीस आली असून मध्यरात्रीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती समजताच गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आपल्या घराला कुलुप लावून श्रीधर हे आपल्या कुटुंबियांसमवेत कामानिमित्त सावनूरला गेले होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ते गावाहून परतले. त्यावेळी दर्शनी दरवाजाला लावलेला कुलुप तसाच होता. कुटुंबियांनी घरात प्रवेश केला असता बेडरुममधील कपाट उघडे होते. वस्तु विस्कटलेल्या अवस्थेत पडल्या होत्या. त्यामुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला.
चोरटय़ांनी पहिल्या मजल्यावरील गेस्ट रुमच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला आहे. पहिल्या मजल्यावर व तळ मजल्यावरील बेडरुममध्ये असलेली कपाटे फोडून सुमारे 20 लाख 64 हजार रुपये किंमतीचे 500 ग्रॅम सोन्याचे दागिने व 2 लाख रुपये पळविले आहेत. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.