समाजसेवक अमित पाटकर यांचे आश्वासन,
प्रतिनिधी/ कुडचडे
पक्षाची उमेदवारी मिळो वा न मिळो, निवडणुकीत विजयी होवो अथवा न होवो, पण कुडचडे व्हायब्रंट करणारच, असे आश्वासन समाजसेवक अमित पाटकर यांनी दिले आहे. बेपकेगाळ-कुडचडे येथे जुन्या सिने प्रशांत थिएटरजवळ व्हायबंट कुडचडेच्या अंतर्गत उभारण्यात येणाऱया ‘अमित पाटकर स्पोर्ट्स एरिना’ प्रकल्पाच्या पायाभरणी सोहळय़ात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, कुडचडेचे माजी आमदार शाम सातार्डेकर, माजी आमदार डॉमनिक फर्नांडिस, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संकल्प अमोणकर, एम. के. शेख, महिला अध्यक्षा बीना नाईक, राजेश ग्रिगलानी, ज्यो डिसोझा, कॅप्टन व्हिरिएतो, युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष नाझीर खान, युरी आलेमाव, सचिव जनार्दन भंडारी, केपेचे काँग्रेस उमेदवार एल्टन डिकॉस्ता, अर्चित नाईक, कुडचडे काँग्रेस गटाध्यक्ष पुष्कल सावंत, डॉ. सतीश कुडचडकर, डॉ. विनायक बुवाजी, मनोहर नाईक, संजय नाईक, पराग सबनीस व कुडचडे गटाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर पाटकर यांच्या मातोश्री दिप्ती पाटकर, त्यांचे काका व इतर कुटुंबीय उपस्थित होते.
आज आपण जे कार्य करत आहे ते आपल्या आजोबा व वडिलांनीही केले आहे आणि त्याच वाटेवरून आपण जात आहे. समाजसेवा म्हूणन हे कुडचडेकरांसाठी करत आहे. आज सर्वांना आश्चर्य वाटत असेल की, एवढी वर्षे पाटकर हे नाव कधी कुडचडेत दिसून आले नाही व आता अचानक ते राजकीय क्षेत्रात दिसू लागले आहे. याचे कारण एकच आहे आणि ते म्हणजे ज्या कुडचडेत आपण लहानाचे मोठे झालो त्या कुडचडेचा कोणत्याच बाजूने विकास झालेला नाही. येथे आमदार म्हणून मिरवत असलेल्यांना कुडचडेकरांसाठी साधा बसस्थानक सुद्धा बांधणे शक्मय झालेले नाही, असे पाटकर यावेळी म्हणाले.
दिशाभूल करण्याचा प्रयत्न
स्थानिक आमदार नीलेश काब्राल हे कुडचडे बाजारातील मोडकळीस आलेले जुने पालिका बाजार संकुल दोन वर्षांत नव्याने बांधून देणार म्हणून सांगत होते. तो प्रकल्प तसाच प्रलंबित ठेऊन व्यापाऱयांना त्यांनी त्रासात टाकलेले आहे. तसेच कुडचडेचे आरोग्य केंद्र अत्यंत आवश्यक असून सुद्धा पूर्ण करण्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे व तथ्य नसलेली कारणे सांगून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा व्यक्तीला कुडचडेवासियांचे कसे पडून गेलेले असेल, असा सवाल त्यांनी केला.
प्रकल्पात विविध खेळांसाठी सुविधा
कुडचडेचे आमदार सरकारात मंत्री आहेत. तरीही माजी आमदारांनी आखलेले प्रकल्प सुद्धा पूर्ण करण्याची त्यांच्यात हुशारी नाही. त्यामुळे कुडचडेतील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याची संधी लाभण्याच्या दृष्टीने आधार देणे हा प्रकल्प हाती घेण्यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अत्याधुनिक क्रीडा प्रकल्पात फुटसाल व व्हॉलीबॉल मैदान, दोन टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, जॉगिंग ट्रक, क्रिकेट नेट प्रॅक्टिस पीचचे प्रयोजन करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा प्रकल्प याअगोदर गोव्यात कुठेच आलेला नाही, असे पाटकर म्हणाले.
आजी-माजी खेळाडूंना माहीत आहे की, कुडचडेत युवा खेळाडूंसाठी फक्त एक कॉम्प्लेक्स मैदान सोडल्यास कोणत्याच सुविधा अस्तित्वात नाहीत व त्या तयार करण्यासाठी सरकारने आजपर्यंत कोणतीही तयारी दाखविलेली नाही. कुडचडेत आवश्यक नसलेला स्विमिंग पूल प्रकल्प सध्या कसा खितपत टाकलेला आहे हे जनता बघत आहे. आमदार हुशार व सर्वांचे भवितव्य बघणारे असते, तर त्यांनी जनतेचा पैसा स्वार्थापोटी वाया घालवला नसता. यावर लोकांनी आताच विचार केला पाहिजे. अन्यथा सध्या कुडचडेत जी हुकूमशाही व दादागिरीचा प्रकार सुरू आहे त्याला पुढे कोणत्याच मर्यादा राहणार नाहीत. आपण जे पाऊल टाकले आहे त्यावर जनतेने विचार करावा व सहकार्य करावे. आपण आश्वासन देतो की, कुडचडेतील कोणालाच खाली मान घालावी लागणार नाही, असे पाटकर पुढे म्हणाले.
…तर कुडचडे व्हायबंट बनेल ः खलप
लोकप्रतिनिधीने गेली कित्येक वर्षे सरकारातही असूनही व कामे करण्याची क्षमता असताना सुद्धा मुद्दामहून जे केले नाही ते पाटकर यांनी करण्याचा विडा उचलला आहे, तोही स्वतःच्या क्षमतेवर. या ‘स्पोर्ट्स एरिना’चा कुडचडेतील प्रत्येक खेळाडूला उच्च स्तरावर पोहोचायला भरपूर लाभ होणार आहे. यात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या कोटय़वधी रुपयांच्या जमिनीत कुडचडेतील जनतेसाठी उपयुक्त प्रकल्प आणण्याचा संकल्प जो सोडतो त्या व्यक्तीची कुडचडेकरांसाठी दूरदृष्टी कशी असेल यावर जनतेने विचार केला पाहिजे, असे मुख्य पाहुणे या नात्याने बोलताना खलप म्हणाले. काही लोक राजकारणात यश प्राप्त झाल्यावर समाजसेवा करतात. पण पाटकर हे कार्य फक्त समाजसेवा म्हणून करत आहेत. तसेच सामान्य लोकांना आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी ते धावपळ करत आहेत. अशा व्यक्तीला जनतेचे सहकार्य मिळाल्यास मागे राहिलेले कुडचडे व्हायब्रंट होण्यास वेळ लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.
जनता धडा शिकवेल ः सातार्डेकर
दुसरा काय करतो याकडे जास्त लक्ष न देता आपण काय करू शकतो याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. तेच कार्य आज अमित पाटकर यांनी केलेले आहे. त्यांनी कुडचडेवासियांसाठी जी संकल्पना तयार केली आहे ती याअगोदर कोणीच केली नव्हती हे एक सत्य आहे, असे श्याम सातार्डेकर म्हणाले. आपण आमदार असताना कुडचडेसाठी जे काम केले ते प्रत्येकाला माहीत आहे. आपण कधीच दुसऱयाला धोका देऊन काम केलेले नाही. पण आपला विश्वासघात करण्यात आला व त्याच आधारे राजा बनून सुख-सोयी घेण्यात मग्न झाला आहे. जनतेच्या अडचणी न सोडविता स्वार्थ साधत असलेल्यांना जनता व्यवस्थित धडा शिकवेल. पाटकर ही एकमेव व्यक्ती सध्या तरी कुडचडेत दिसून येत आहे जी कुडचडेवासियांच्या भवितव्याविषयी विचार करण्यात रस घेत आहे. हे आम्हा सर्वांचे सौभाग्यच समजू व त्यांना पाठिंबा देऊ, असे उद्गार सातार्डेकर यांनी यावेळी काढले.
कार्यक्रमादरम्यान विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिल्लीहून मोबाईलवरून पाटकर यांना शुभेच्छा दिल्या. बीना नाईक, कॅप्टन व्हिरिएतो, पुष्कल सावंत, वरद म्हार्दोळकर, ज्यो डिसोझा यांनीही पाटकर यांचे कौतुक केले सुरुवातीला कुडचडेचे पहिले आमदार विठ्ठल करमली यांच्या तसबिरीला पुष्पांजली वाहिली गेली. नंतर मान्यवरांच्या हस्ते प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी डॉ. बुवाजी यांचा खलप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनोहर नाईक यांनी स्वागत केले, तर पराग सबनीस यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमास कुडचडे येथील तीन हजारांहून जास्त लोकांनी उपस्थिती लावली होती