वार्ताहर / विजापूर :
घराचा मागचा दरवाजा तोडून चोरटय़ांनी लाखो रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना विजापूरच्या इब्राहिमपूर येथील लक्ष्मीनगर येथे गुरुवारी घडली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, खासगी उद्योजक मल्लिकार्जुन पाटील हे कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान, त्यांची पत्नीअश्विनीही आपल्या मुलाला घेऊन आपल्या नातलगांच्या घरी गेली होती. घरात कोणी नसल्याचे पाहून चोरटय़ांनी दिवसाढवळय़ा मल्लिकार्जुन यांच्या घराचा मागचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे लॉकर तोडून चोरटय़ांनी 105 ग्रॅम सोन्याचे दागिने, 800 ग्रॅम चांदीची दागिने आणि 29 हजार रोख रक्कम लंपास करून फरारी झाले. काही वेळानंतर पती-पत्नी घरी परतले व घराचा दरवाजा उघडला असता काही वस्तू विस्कटलेल्या आढळून आल्या. तात्काळ त्यांनी खोलीत प्रवेश करून पाहिले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना चोरीची माहिती दिली. जलनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करून चोरटय़ांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेची नोंद जलनगर पोलीस स्थानकात झाली आहे.