आमदार अनिल बाबर वाढदिवस समितीचा निर्णय
प्रतिनिधी / विटा
आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त बळीराजा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचा आदर करून कृषी प्रदर्शन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचे संकट आटोक्यात येताच पुन्हा कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल. परंतु सद्यस्थितीत मात्र हे प्रदर्शन स्थगित करण्याचा निर्णय घेतलेची माहिती सन्मान सोहळा समितीच्यावतीने देण्यात आली आहे.
आमदार अनिल बाबर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला होता. परंतु गेल्या ४ दिवसापासून अनपेक्षितपने कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे गर्दीचे कार्यक्रम टाळावेत, अशा सूचना शासन आणि प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. गेल्या २ वर्षात कोरोनामुळे जी जीवित हानी झाली आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेता कृषी प्रदर्शन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे संयोजन समितीने दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.
दरवर्षी कृषी प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद लाभतो. साहजिकच आबालवृद्धांची गर्दी निर्माण होते. त्यामुळे वस्तुस्थिती लक्षात घेऊन कसलाही धोका पत्करणे योग्य नाही. याउलट जास्तीत जास्त लसीकरण करणे, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर आयोजित करणे असे गरजेचे उपक्रम शासनाचे नियम पाळून आणि सोशल डिस्टन्स ठेऊन करण्याचा आमचा मानस आहे. कोरोना हे जगावर आलेले मोठे संकट आहे. गेल्या २ वर्षात आपली सर्वांचीच आर्थिक, सामाजिक घडी विस्कटली आहे. त्यात ओमायक्रॉन च्या नव्या व्हेरियंट ची चर्चा सुरु झाली आहे. तिसरी लाट येऊ नये यासाठी जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे, असे समितीने म्हंटले आहे.
शासनाच्या, प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करून तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे आपले कर्त्यव्य आहे. त्यामुळे आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या सूचनेनुसार कोणीही गर्दीचे कार्यक्रम करू नये. मास्क व सॅनिटायझर चा वापर करावा. ज्यांचे लसीकरण झाले नसेल त्यांनी लसीकरण करून घ्यावे. लसीकरणाबाबत कसलीही अडचण अगर समस्या असल्यास संपर्क साधावा असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.