सनसनाटी विजयासह बेल्जियमची उपांत्यपूर्व फेरीत धडक, थॉर्गन हॅझार्डचा सामन्यातील एकमेव गोल ठरला निर्णायक
सेव्हिल्ले-स्पेन / वृत्तसंस्था
विद्यमान विजेत्या पोर्तुगाल संघाचे या मोसमातील आव्हान बेल्जियमविरुद्ध धक्कादायक पराभवामुळे संपुष्टात आले. बेल्जियमने 1-0 अशा निसटत्या फरकाने पोर्तुगालला नमवत खळबळ उडवून दिली. 43 व्या मिनिटाला थॉर्गन हॅझार्डने सामन्यातील एकमेव गोल नोंदवला आणि हाच निर्णायक गोल ठरला.
दुसऱया सत्रात पोर्तुगालने अनेक सरस चढाया केल्या. मात्र, फिनिशिंगच्या अभावामुळे त्यांना सातत्याने अपयश येत राहिले आणि बेल्जियमची पहिल्या सत्राअखेरची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. पाच वर्षांपूर्वी पोर्तुगालने पॅरिसमध्ये जेतेपदावर आपली मोहोर उमटवली होती. येथे मात्र त्यांना प्री-क्वॉर्टर्समध्येच गाशा गुंडाळावा लागला आहे.
या लढतीत पोर्तुगालने अनेकदा गोल नोंदवण्याच्या नामी संधी दवडल्या आणि याचा त्यांना बराच फटका बसला. सामना सुरु झाल्यानंतर अवघ्या 6 व्या मिनिटाला दिओगो जोटाचा फटका गोलपोस्टबाहेर गेल्याने पोर्तुगालला आघाडी मिळवता आली नाही. रेनॅटो सँचेसने मिडफिल्डमधून चेंडूवर ताबा कायम राखत डावीकडे मोक्याच्या जागी तैनात जोटाकडे उत्तम पास दिला होता. मात्र, जोटाचा अंदाज चुकला.
त्यानंतर रोनाल्डोने जोरदार फ्री कीक लगावत बेल्जियमचा गोलरक्षक कोर्टोईसची कसून परीक्षा घेतली. पोर्तुगीज प्रशिक्षक फर्नांडो सॅन्टोस यांनी आक्रमणावर भर देण्यात संघ मागे राहणार नाही, याची पूर्ण तजवीज करुन ठेवली होती. मात्र, प्रारंभी, बचावात्मक व सावध पवित्र्यावर भर देणाऱया बेल्जियमने मजल-दरमजल वर्चस्व गाजवण्याच्या दिशेने गेमप्लॅन आखला आणि तो काटेकोरपणे अंमलात देखील आणला. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पहिल्या सत्रात 3 मिनिटांचा खेळ बाकी असताना ते आघाडीवर पोहोचले.
थॉमस म्युनेरच्या अप्रतिम पासचा उत्तम लाभ घेत थॉर्गन हॅझार्डने पोर्तुगीज गोलरक्षक रुई पॅट्रिसिओचा अंदाज चुकवला आणि हाच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. दुसऱया सत्रात अवघ्या तिसऱयाच मिनिटाला डी ब्रुईन दुखापतीमुळे बाहेर गेल्याने बेल्जियमसाठी हा धक्का ठरला. याचा लाभ घेण्यासाठी पोर्तुगीज मॅनेजर सॅन्टोस यांनी ब्रुनो फर्नांडिसला मैदानावर पाचारण केले. या हंगामातही उत्तम बहरात असलेल्या रोनाल्डोने देखील अनेक जोरदार आक्रमणे केली. पण, त्याला व त्याच्या सहकाऱयांना गोल करण्यात यश मिळाले नाही आणि बेल्जियमचा संघ दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला.
बेल्जियमचा संघ आता उपांत्यपूर्व फेरीत इटलीविरुद्ध लढेल. इटलीने शनिवारी म्युनिचमध्ये झालेल्या लढतीत ऑस्ट्रियाचा 2-1 असा फडशा पाडला. इटलीचा संघ मागील 31 सामन्यांपासून अपराजित आहे.
अन् निराश रोनाल्डोने ‘कॅप्टन्स आर्मबँड’ मैदानावर फेकले!
बेल्जियमविरुद्ध पराभवानंतर निराश झालेल्या पोर्तुगीज कर्णधार रोनाल्डोने रागाने कॅप्टन्स आर्मबँड मैदानावर फेकले आणि यामुळे सोशल मीडियावरुन यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याने ‘आर्मंबँड’ फेकत देशाचा अवमान केला असल्याची प्रतिक्रिया काही चाहत्यांनी व्यक्त केली तर काही चाहत्यांनी पोर्तुगाल पुढील स्पर्धेत आणखी तयारीने मैदानात उतरेल, अशी आशा नोंदवली. 36 वर्षीय रोनाल्डो पुढील युरो स्पर्धेत खेळू शकेल का, याबद्दल साशंकता असल्याने काही चाहत्यांनी त्याच्या स्पर्धेतील एक्झिटमुळे खंत व्यक्त केली.