डॉ. मीना चंदावरकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेळगाव
भारतीय शिक्षण मंडळ उत्तर कर्नाटक विभाग नीती आयोग व केएलई अकॅडमी ऑफ द हायर एज्युकेशन ऍण्ड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ‘नूतन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यामध्ये शिक्षकांची भूमिका’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षण मंडळाच्या पालक अधिकारी आणि पुण्यातील महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मीना चंदावरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी आपल्या बीजभाषणात त्यांनी भारतीय शिक्षण परंपरेमध्ये गुरुकुल पद्धतीपासून ब्रिटीश काळापर्यंतच्या बदलत्या शैक्षणिक प्रवाहांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना खतपाणी घालून त्यांच्या विकासाला चालना देण्यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे त्या म्हणाल्या. भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश जिगजीनी यांनी भारतीय शिक्षण पद्धती आणि नूतन शैक्षणिक धोरणाचे वैशिष्टय़ याचा तुलनात्मक आढावा घेतला. नूतन शैक्षणिक धोरणामध्ये अंतर शाखांचा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे, असे ते म्हणाले.
केएलई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी यांनी अध्यक्ष या नात्याने बोलताना, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांचे कर्तव्य कोणते आहे, यावर विवेचन केले. प्रारंभी विनायक जोशी यांनी संघटना मंत्र म्हटला. केएलई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले यांनी स्वागत केले. प्राध्यापक के. आर. अलगवाडी यांनी भारतीय शिक्षण मंडळाची माहिती देऊन पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यानंतर नूतन शैक्षणिक धोरणावर गटचर्चा झाली. डॉ. अविनाश कवी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एम. ए. उडचणकर यांनी आभार मानले.