सौरऊर्जेपासून धावणारी इलेक्ट्रिक व्हॅन, टीव्ही पाहता येणार, लॅपटॉप चार्ज करता येणार
नेदरलँड्सच्या विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेने धावणारी इलेक्ट्रिक व्हॅन तयार केली आहे. हे व्हॅन इंधनासाठी पूर्णपणे स्वतःवर निर्भर आहे. याचे नाव स्टेला विटा ठेवण्यात आले असून या व्हॅनमधील ऊर्जेचे प्रमाण अधिक असल्याने याचा वापर करत तुम्ही कारमध्ये बसून टीव्ही पाहू शकता, लॅपटॉप चार्ज करू शकता तसेच स्वयंपाकही करू शकता. व्हॅनमधील बॅटरीमुळे 600 किलोमीटरचा सलग प्रवास करता येणार आहे.
व्हॅनच्या छतावर बसविण्यात आलेले सौरघट त्याला सातत्याने ऊर्जा पुरविण्याचे काम करतात. या व्हॅनची निर्मिती नेदरलँड्सच्या आइढोवेन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीच्या 20 विद्यार्थ्यांनी मिळून केली आहे. व्हॅनची क्षमता पडताळून पाहण्यासाठी हे विद्यार्थी युरोपच्या ट्रिपवर निघाले आहेत. व्हॅनसोबत 3 हजार किलोमीटरचा प्रवास स्पेनच्या टरिफा शहरात संपणार आहे.
व्हॅनमधील सुविधा
या व्हॅनमध्ये एक कक्ष असून ज्यात डबल बेड, डायनिंग टेबल आणि सिटिंग एरिया आहे. याचबरोबर स्टोव्हसोबत सिंकही देण्यात आला आहे. तसेच आंघोळीसाठी शॉवरचीही व्यवस्था आहे. व्हॅनच्या पुढील हिस्स्यात चालकासोबत दोन जणांच्या बसण्याची व्यवस्था आहे.
चाकांवर चालते-फिरते घर
या ट्रिपदरम्यान विद्यार्थी विविध शहरांमध्ये शो आयोजित करतील. स्वतःच्या शोद्वारे भविष्यात ऊर्जेला वाचविण्यासाठी लोकांना जागरुक करतील. ही एक व्हॅन नसून चाकांवरील चालते-फिरते एक घर असल्याचे उद्गार विद्यार्थ्यांच्या पथकातील सदस्य लॉटे वेन डेसलरने म्हटले आहे.
ऊर्जावापराची माहिती
व्हॅनमधील एक यंत्रणा किती ऊर्जा निर्माण झाली हे सांगते. स्वयंपाक करणे, शॉवर घेणे आणि टीव्ही पाहण्यासाठी किती ऊर्जा वापरली गेली हे देखील या यंत्रणेमुळे समजणार आहे. यातून ऊर्जेचा योग्य वापर करता येणार आहे.
120 किमीचा वेग
आकाश निरभ्र असल्यास ही व्हॅन 120 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने 730 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करण्यास सक्षम आहे. यात 60 किलो वॅट ऑवरची बॅटरी बसविण्यात आली आहे. याच्या मदतीने रात्रीच्या वेळी देखील 600 किलोमीटर अंतरापर्यंतचा प्रवास करता येतो.