क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
क्रीडा भारती व पतंजलीतर्फे रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार दिन व शिवजयंती यांचे औचित्य साधून क्रीडा भारती बेळगाव, पतंजली योग समिती, आरोग्य भारती, विद्या भारती यांच्या संयुक्त विद्यमाने संत मीरा स्कूल येथे सूर्यनमस्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थी, पालक व नागरिकांनी या उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
संत मीरा मैदानावर या सूर्यनमस्कार व शिवजयंतीच्या उद्घाटनप्रसंगी क्रीडा भारतीचे प्रांत अध्यक्ष व अर्जुन पुरस्कार विजेते प्रशिक्षक मुकुंद किल्लेकर, आरोग्य भारतीचे नगर कार्यदर्शी श्रीकांत नाईक, पतंजली योग समितीचे अध्यक्ष मोहन बागेवाडी, भारत स्वाभिमानचे पुरूषोत्तम पटेल, किसान सेवा समितीचे जोतिबा भादवणकर, युवा भारतीचे रमेश पाच्छापुरे, किरण मन्नोळकर, अशोक शिंत्रे, विश्वास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन मुकुंद किल्लेकर यांनी केले तर भारतमाता, सरस्वती देवी व ओमकार प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत वासुदेव इनामदार यांनी केले. कुमारी मेघा धामणेकर हिने पोवाडा सादर केला. शिवशाही पोषाखात विद्यार्थ्यांनी मानाचा मुजरा देत गीत सादर केले. जोतिबा भादवणकर, किरण मन्नोळकर यांनी अग्निहोत्र केले. त्यानंतर प्राणायाम, ओमकार व बारा सूर्यनमस्कार घालण्यात आले.
सूर्यनमस्कारामुळे शरीर सदृढ
यावेळी डायनामिक ऍथलेटिक्स खेळाडू, बालिका आदर्श स्कूलच्या विद्यार्थिनींनी 108 सूर्यनमस्कार पूर्ण केले. यावेळी किरण मन्नोळकर म्हणाले, नियमित प्राणायाम व सूर्यनमस्कार केल्यास शरीर सदृढ बनते, मनुष्य तणावमुक्त होतो व रोगराईपासून दूर राहतो. यासाठी नियमित प्राणायाम व सूर्यनमस्कार करावा, तरच आपला देश सदृढ बनू शकतो. विद्यार्थ्यांनी या गोष्टी आचरणात आणणे ही काळाची गरज आहे.
यावेळी मोहन पत्तार, विवेक पाटील, उमेश बेळगुंदकर, चंद्रकांत तुर्केवाडी, मधुकर देसाई, अनुराधा पुरी, व्ही. जी. सोलोमन, विनायक धाकलुचे, तेजस्वीनी धाकलुचे, उमेश भांदुर्गे, उमेश कुलकर्णी, आबा स्पोर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने भाग घेतला. विश्वास पवार यांनी सूत्रसंचालन केले. तर अशोक शिंत्रे यांनी आभार मानले.