पुलाची शिरोली/ वार्ताहर
पुलाची शिरोली येथील आर्यन हेरंब बुडकर (वय वर्षे. १५) या शाळकरी मुलाच्या आत्महत्येस कारणीभूत शिक्षण संस्था चालकांविरुध्द (पति पत्नी) शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होणार याची माहिती मिळताच सिम्बॉलीक इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष गणपती जनार्दन पाटील आणि प्राचार्या गिता गणपती पाटील हे पति पत्नी गुरुवारी मध्यरात्रीपासून फरारी झाले आहेत.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आर्यन हा पुलाची शिरोली येथील सिम्बॉलीक इंटरनॅशनल स्कूल मध्ये दहावीच्या वर्गात शिकत होता. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता शाळेत फुटबॉल खेळत असताना बॉल चुकुन एका विद्यार्थीनीला लागला. संबंधीत विद्यार्थीनीने ही माझी चूक आहे असे शाळा प्रशासनास सांगितले. तरीही आर्यनला शाळेचे अध्यक्ष गणपती पाटील यांनी आजोबांसमोर अपमानास्पद व अपशब्द भाषा वापरत शाळेतुन काढून टाकणार असल्याचे सांगितले. तसेच तू सोमवारपासून शाळेत येऊ नकोस, आलास तर याद राख. असेही बजावले. आर्यन मात्र माझी काहीच चुक नाही असं विनवणी करुन सांगत होता. पण संस्था चालकांनी त्याची बाजू ऐकूणच घेतली नाही. त्यामुळे शाळा सुटल्यावर सर्व मुले, शिक्षक व कर्मचारी घरी गेले पण आर्यन मात्र एकटाच डोक्यावर हात ठेवून शाळेच्या कट्ट्यावर बसला होता. आजोबांनी विनंती करुन त्याला घरी नेले. आजोबा शेतात गेले असता आर्यंनने घरात सोफ्यावर शाळेची पिशवी, ब्लेझर ठेवले आणि थेट आपल्या रुम मध्ये जाऊन फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.
कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर आजोबा रामचंद्र बुडकर, वडील हेरंब बुडकर आणि नातेवाईकांनी आमच्या मुलाच्या आत्महत्येस शाळाच जबाबदार आहे असा आरोप करत संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता गणपती पाटील आणि गिता पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याची खात्री करूनच आर्यनच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शाळा प्रशासनाने गावातील मुलांना व पालकांना वारंवार वेठीस धरले जात आहे, तसेच एका विद्यार्थ्याचा हकनाक बळी गेला आहे. त्यामुळे शाळा प्रशासनाच्या विरोधात सोमवारी सकाळी मोर्चा काढण्यात येणार आहे.