विधानसौधसमोर पं. नेहरूंचा पुतळा बसविण्यास मुख्यमंत्र्यांची संमती
प्रतिनिधी / बेंगळूर
विधानसौधसमोर दिवंगत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळय़ाची पुनर्पतिष्ठापणा करावी, अशी मागणी करून विधानपरिषदेत काँग्रेसच्या सदस्यांनी आंदोलन छेडले. शेवटी सरकारच्यावतीने मंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी नेहरुंचा पुतळा पुन्हा बसविण्यासाठी ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आंदोलन मागे घेतले.
विधानपरिषदेत बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बोसराज यांनी, पं. जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा विधानसौधच्या समोरील आवारात पुन्हा बसविण्यात यावा, अशी मागणी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना सभागृह नेते कोटा श्रीनिवास पुजारी यांनी याबाबत विचार करून पुढील भूमिका ठरविण्यात येईल, असे उत्तर दिले. यावर काँग्रेस सदस्यांनी आक्षेप घेतला. मेट्रो रेल्वे योजनेच्या कामामुळे विधानसौधच्या समोर असणारा नेहरूंचा पुतळा पश्चिम भागात बसविण्यात आला आहे. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मूळ जागी बसविण्याचा आदेश आहे. या आदेशाची त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी करत सभापतींच्या आसनासमोर आंदोलन छेडले.
विधानपरिषद सदस्य के. गोविंदराज यांनी नियम 72 अंतर्गत मांडलेल्या सूचनापत्रावर मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी लेखी उत्तर देताना विधानसौधसमोर योग्य जागा निवडून तेथे नेहरूंच्या पुतळय़ाची पुनर्प्रतिष्ठापणा करण्यात येईल, असे सांगितले.