प्रतिनिधी/ सातारा
राज्याच्या राजकारणात विधान परिषदेचे सभापती म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आपली छाप उमटवली आहे. आता त्यांचे जावई विधानसभेच्या अध्यक्षपदी 57 मतांनी विजयी होऊन त्यांची निवड झाली आहे. त्यामुळे विधान परिषदेत सासरे रामराजे नाईक-निंबाळकर हे तर जावई राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहू लागले आहेत. हे महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात पहिलेच रेकॉर्ड बनले आहे.
गत महिन्यामध्ये सुरु असलेल्या राजकीय उलथापालथी आणि राजकीय भूकंपाचे धक्के दि. 3 जुलैपर्यंत सुरुच होते. प्रत्येक राजकीय घडामोडीत सातारा जिह्याची भूमिका होती. सुरुवातीपासून बंडामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱयाचे. त्यांना सोबत दिलेले शंभूराज देसाई आणि आमदार महेश शिंदे हेही सातारा जिह्यातील आहेत. या तिघांनी सुरु केलेली लढाई जिंकली आहे. दि. 3 रोजी विधानसभेत संख्याबळाची अग्निपरिक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर होती. त्यांनी ती चांगल्या प्रकारे पार पाडली. यामध्ये पुन्हा साताऱयाशी नाळ जोडली गेली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांचे अध्यक्षपदासाठी नावाचा प्रस्ताव मांडला. त्यास गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिले तर महाविकास आघाडीतून शिवसेनेचे राजन साळवी यांचा अर्ज भरला होता. सुरुवातीला मतदान आवाजी झाले, त्यानंतर मोजणी पद्धत करण्यात आली. त्यामध्ये राहुल नार्वेकर यांना 164 मते तर साळवी यांना 107 मते मिळाली. 57 मतांनी राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष झाले.
नार्वेकर सर्वात तरुण अध्यक्ष
आतापर्यंतच्या इतिहासात विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेचे वयाने ज्येष्ठ राहिलेले आहेत. परंतु रविवारी निवड करण्यात आलेले राहुल नार्वेकर हे देशात सर्वात लहान वयाचे विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यांचे सर्वांकडूनच कौतुक झाले. विशेष म्हणजे ते फलटणकरांचे जावई असल्याने फलटणमध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजेंसाठीही चांगलेच असून त्यांचे विरोधक असलेले भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासाठीही चांगलेच आहेत. त्यामुळे फलटण हे मात्र पुन्हा एकदा विधान परिषदेचे सभापती आणि विधान सभेचे अध्यक्ष यावरुन चर्चेला आले आहे. तसेच सर्वात लहान अध्यक्ष असल्याने त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादांनी खास शब्दात त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.