टेंगीनकेर गल्लीतील व्यावसायिकांना सात दिवसांची दिली होती मुदत
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील व्यावसायिकांनी विनापरवाना व्यवसाय थाटला असल्याने महापालिकेकडून नोटीस बजावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. टेंगीनकेरा गल्लीतील व्यावसायिकांना परवाना घेण्यासाठी नोटीस बजावून सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. तरीदेखील परवाना घेण्यासाठी अर्ज केला नसल्याने आता दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे.
विनापरवाना व्यावसायिकांचा शोध घेण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला होता. यानुसार आरोग्य विभागाच्यावतीने विनापरवाना व्यावसायिकांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. यापूर्वी नोटीस बजावून सात दिवसांत व्यवसाय परवाना घेण्याची सूचना करण्यात आली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही. सात दिवसांची मुदत संपल्यानंतरही व्यावसायिकांनी व्यवसाय परवाना घेण्यासाठी अर्ज केले नाहीत. विनापरवाना व्यावसायिकांना देण्यात आलेली मुदत संपुष्टात आली आहे.
त्यामुळे सोमवारी टेंगीनकेरा गल्लीतील व्यावसायिकांकडे परवान्याची विचारणा करण्यात आली. यापूर्वी नोटीस बजावण्यात आलेल्या व्यावसायिकांना दुसऱयांदा नोटीस बजावण्यात आली आहे. तीनवेळा नोटीस बजावूनही व्यवसाय परवाना घेतला नसल्यास व्यवसायाला टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतून उपलब्ध झाली आहे.
विनापरवाना व्यावसायिकांमध्ये तळघरांतील व्यावसायिकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे व्यवसाय परवाना घेण्यासाठी नोटीस बजावून दुप्पट दंड आकारणी करण्यात येत आहे. यापुढेही विनापरवाना व्यावसायिकांविरोधातील मोहीम तीव्रपणे राबविण्यात येणार आहे.