बेळगाव / प्रतिनिधी
स्टार एअरने सोमवारपासून बेळगाव- इंदूर या विमानसेवेला सुरूवात केली. उडान -3 अंतर्गत या मार्गावर विमान झेपावत आहे. राज्यसभा सदस्य खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते या नव्या विमानफेरीचे उद्घाटन करण्यात आले. बेळगावच्या सांबरा विमानतळावर हा छोटेखानी उद्घाटन सोहळा पार पडला.
खासदार डॉ. कोरे म्हणाले, स्टार एअरने अनेक महत्त्वाच्या शहरांना विमानसेवेद्वारे जोडून बेळगावच्या प्रवाशांना सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता दिल्ली व देशातील इतर शहरांना सेवा देण्याकरीता प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
91 प्रवाशांचा प्रवास
स्टार एअरने 50 आसनक्षमता असणारे विमान या मार्गावर सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी बेळगाववरून 40 प्रवाशांनी इंदूरला प्रवास केला. तर इंदूरवरून 41 प्रवाशांनी बेळगाव गाठले. पहिल्याच दिवशी एकूण 91 प्रवाशांनी प्रवास केल्यामुळे स्टार एअरकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
स्टार एअर व बेळगाव विमानतळ प्रशासनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रारंभी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक राजेशकुमार मोर्य यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते फित कापून व दीपप्रज्वलन करून या सेवेचा प्रारंभ झाला. घोडावत ग्रुपचे संचालक निलेश बागी, मार्केटींग प्रमुख ऋ=तूराज व राजकुमार, विक्री व्यवस्थापक शशिकांत यासह इतर उपस्थित होते.