नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बहरातील ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशानेने विराट कोहली व स्टीव्ह स्मिथ यांना सर्व क्रिकेट प्रकारात मागे टाकण्यासाठी भारताविरुद्धची आगामी मालिका आपल्यासाठी महत्त्वाची असेल, असे म्हटले आहे. 22 वर्षीय लाबुशानेने पाकिस्तानविरुद्ध लागोपाठ शतके झळकावली असून न्यूझीलंडविरुद्धचे त्याचे द्विशतक लक्षवेधी ठरले. त्या पार्श्वभूमीवर, भारत दौऱयाबाबतही लाबुशाने महत्त्वाकांक्षी आहे.
ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध दि. 14 जानेवारीपासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार असून यासाठी त्यांचे गुरुवारी रात्री आगमन झाले. त्यानंतर शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत लाबुशाने बोलत होता.
लेगब्रेक गोलंदाजीही करु शकणाऱया लाबुशानेने भविष्यात सर्व क्रिकेट प्रकारात दीर्घकालीन सातत्य राखण्याचे आपले लक्ष्य असल्याचे येथे नमूद केले. ‘स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली, केन विल्यम्सन, जा रुट प्रदीर्घ कालावधीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण योगदान देत आले आहेत. पाच-सहा वर्षांपासून त्यांनी या आघाडीवर साम्राज्य गाजवले आहे. अर्थात, त्यांची ही मक्तेदारी कोणत्याही एका क्रिकेट प्रकारापुरती मर्यादित नाही. तिन्ही क्रिकेट प्रकारात ते अधिराज्य गाजवत आहेत. मलाही त्याचीच पुनरावृत्ती करायची आहे’, असे लाबुशाने म्हणतो.
‘मी या हंगामात जोरदार सुरुवात केली आहे. पण, कामगिरीत सातत्य राखणे, प्रतिस्पर्ध्यांवर सातत्याने दडपण राखणे, हे माझ्यासमोरील खरे आव्हान आहे. त्या दृष्टीने मी रणनीती राबवेन’, असे आतापर्यंत खेळलेल्या 14 कसोटी सामन्यात 1459 धावांचा रतीब घालणाऱया या युवा फलंदाजाने नमूद केले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये लाबुशानेला प्रथमच संघात स्थान मिळाले असून भारतात स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो ही नामी संधी मानतो.
‘भारतात खेळताना फिरकी गोलंदाजीला आपण कसे सामोरे जातो, यावरच सर्व समीकरणे अवलंबून असतात आणि येथे फिरकीचा बीमोड कसा करायचा, हे मी ठरवलेले आहे’, असे लाबुशाने आपल्या गेमप्लॅनबद्दल बोलताना म्हणाला. आपल्यासमोर मायकल हसीचा आदर्श असल्याचे त्याने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. तो म्हणाला, ‘हसी वनडे क्रिकेटमध्ये जशी सुरुवात करायचा, त्याच धडाक्यात डावही संपवायचा. माझ्या व त्याच्या खेळीत बरेच साम्य आहे. पण, मी माझी हसीशी तुलना करु इच्छित नाही’.
एरवी लाबुशानेला तिसऱया स्थानी फलंदाजी करणे पसंत असते. पण, वनडे क्रिकेटमध्ये ऍरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ अशी आघाडीची लाईनअप कायम राहणार असल्याने त्यानंतर लाबुशाने, पीटर हँडस्कॉम्ब, ऍलेक्स कॅरे व ऍस्टॉन टर्नर यांना उर्वरित स्थानी फलंदाजीला धाडले जाईल, असे संकेत आहेत.