वधूने पाठविले 17 हजारांचे बिल
विवाहसोहळय़ासाठी पाहुण्यांची मोठी यादी असते, अनेक प्रकारची तयारी केली जाते. पाहुण्यांना काहीच कमी पडू नये याकरता प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेतली जाते. पण व्यवस्थेनुसार पाहुणेच न आल्यास अन्नापासून अनेक गोष्टींची नासाडी होते. विवाहाच्या पार्टीला अनुपस्थित राहणाऱया अशाच पाहुण्यांना वधूने 17 हजार रुपयांचे बिलच पाठविले आहे. या बिलाची कॉपी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ब्रिटनमध्ये एका विवाहसोहळय़ादरम्यान वधूने उत्तम प्रकारची व्यवस्था करविली होती. वधूने प्रत्येक पाहुण्याकरता 175 युरोंचा (सुमारे 17 हजार रुपये) खर्च करत त्यांच्यासाठी रिस्पेशन डिनर आणि अन्य गोष्टींची व्यवस्था केली. अशा स्थितीत निमंत्रण असूनही पाहुणे रिसेप्शनला न पोहोचल्याने वधूने वाया गेलेल्या गोष्टींचा पैसा वसूल करण्यासाठी संबंधितांच्या घरीच बिल पाठविले आहे.
रिसेप्शन पार्टीला अनुपस्थित राहणाऱया पाहुण्याने वधूकडून पाठविण्यात आलेल्या इनवॉइसची प्रत शेअर केली आहे. या इनवॉइसच्या शीर्षकात ‘नो कॉल, नो शो गेस्ट’ असे आहे. विवाहाचा रिसेप्शन डिनर चुकविल्याने दोन सीट्स रिकामी राहिल्या, त्याकरता हे बिल पाठविले जात असल्याचे तपशीलात नमूद आहे.
इनवॉइसच्या नोट्स सेक्शनमध्ये ‘हे बिल तुम्हाला द्यावे लागेल, कारण तुम्ही आम्हाला पार्टीला अनुपस्थित राहणार याबद्दल पूर्वकल्पना दिली नव्हती, याचमुळे तुम्हाला हे बिल लवकरात लवकर भरावे लागेल’ असे म्हटले आहे.
‘तुम्ही ऑनलाईन पेमेंट जेल किंवा पेपैलच्या माध्यमातून रक्कम भरणा करू शकतात. कृपया आमच्याशी संपर्क साधा आणि कुठल्या पद्धतीने पैसे जमा करणा हे सांगा’ असेही इनवॉइसमध्ये म्हटले गेले आहे.