प्रतिनिधी /बेळगाव
शहरात विविध ठिकाणी शनिवारी मोठय़ा उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच दत्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. रविवारीही काही मंदिरांमध्ये धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. काही मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
माधवपूर वडगाव दत्त मंदिर
माधवपूर दत्त गल्ली वडगाव येथील दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी पालखी मिरवणूक काढण्यात आली. दत्तगल्ली, सोनार गल्ली मार्गे पालखी काढण्यात आली. पालखी सोहळय़ात श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडळाचे भजन झाले. पालखीचे पूजन ट्रस्टचे अध्यक्ष अजित कंग्राळकर यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवारी सकाळी 6 वा. दत्त महाराजांना विधिवत अभिषेक घालण्यात आला. सायंकाळी लव महाराज यांचे कीर्तन झाले. सायंकाळी 6 वा. दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडला. तीर्थप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मंदिर ट्रस्टचे सदस्य व वडगाव परिसरातील भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आनंदनगर वडगाव
औदुंबर मित्र मंडळ तिसराक्रॉस आनंदनगर येथील दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती साजरी करण्यात आली. सकाळी मूर्तीला अभिषेक व सायंकाळी जन्मोत्सव सोहळा पार पडला. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी परिसरातील भाविकांची गर्दी झाली होती.