वार्ताहर / म्हासुर्ली
म्हासुर्ली पैकी कुंभारवाडी (ता.राधानगरी) येथे अन्न पाण्याच्या शोधार्थ रात्रीच्या वेळी भटकंती करत आलेल्या गवा रेडा लहान पिल्यासह विहिरीत पडला. मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व स्थानिक ग्रामस्थांना सदर गवारेड्यांना बाहेर काढण्यात यश आले.परंतु गवारेडे विहिरी बाहेर येताच बिथरलेल्याने शेतात काम करत असलेल्या दोघांवर हल्ला केला. यात एक नागरिक गंभीर जखमी झाला. सदाशिव विष्णू कांबळे (वय.४५) असे जखमीचे नाव आहे. तर एकजण केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावला आहे.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, की दगडू गोविंदा कुंभार यांच्या बाबटेसखल नावाच्या शेतातील विहिरीत रात्रीच्या वेळी एक गवा पिल्यासह पडला असल्याची घटना शुक्रवार सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. त्यानंतर साडे दहाच्या सुमारास वनविभागाचे वन अधिकारी दिनेश टिपुगडे, राजाराम कांबळे यांनी घटनास्थळाची पाहणी करुन स्थानिक नागरिकांच्या मदतीने सदर गव्यास पिलासह विहिरीतून बाहेर काढून जीवदान दिले.