पालसरे केरी येथील घटना
प्रतिनिधी / फोंडा
वीज खंडित झाल्याची तक्रार देण्यासाठी जातान वीज खांब कोसळून जखमी झालेल्या त्या दुसऱया जखमी युवकाचा उपचार घेत असताना बांबोळी येथी गोमेकॉत मृत्यू झाला. श्याम पोकू नाईक (40,धामणसरे-बेतकी) असे त्याचे नाव आहे.
सदर घटना रविवार 16 मे रोजी दुपारी 1.30 वा. सुमारास घडली होती. पालसरे येथून वीज खडितसंबंधी माशेल वीज केंद्रावर तक्रार देण्यासाठी जात असताना चालत्या दुचाकीवर अचानक रस्त्यावर वीजेचा खांब कोसळल्याने दुचाकीचालक केशव जगन्नाथ नाईक याचा मृत्यू झाला होता. त्याच्या पाठोपाठ दुचाकीच्या पाठीमागे असलेला जखमी श्याम याचाही काल बांबोळी येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला. त्यामुळे पालसरे व धामणसरे गावात शोककळा पसरली आहे. मयत श्याम यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक रश्मी भाईडकर अधिक तपास करीत आहे.