मुख्य वीज अभियंत्यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ पणजी
विजेच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. आधीच कोरोनामुळे लोक संकटात असताना दरवाढ करण्याचा कोणताही निर्णय सरकार घेणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी गोंधळून जाऊ नये, असे आवाहन मुख्य वीज अभियंता रघुवीर केणी यांनी केले आहे.
पणजीतील वीज मुख्यालयात काल मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अधीक्षक अभियंता मयूर हेदे आणि अधीक्षक अभियंता स्टिफन फर्नांडीस यांची उपस्थिती होती.
गोवा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी संयुक्त वीज नियमन आयोगाने यापूर्वी वीज दरात वाढ सूचविली होती. परंतु गोवा राज्याने त्यात कोणताही बदल केलेला नाही. गोव्यात सध्यस्थितीत दोन वर्षापूर्वीचेच वीज दर आहेत. अशा परिस्थितीत काही वृत्तपत्रे आणि सामाजिक माध्यमांमधून गोव्यात चौपटीने वीज दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र सदर वृत्त हे पूर्णतः अफवा असून त्यात कोणतेही तथ्य नाही, असे स्पष्टीकरण केणी यांनी दिले आहे.
गोवा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी इंधन आणि वीज खरेदी दरफरक सूत्र ठरलेले असते. त्याद्वारे प्रत्येक तीन महिन्यात इंधन आणि वीज दरांचा आढावा घेण्यात येतो. गोव्याला एनटीपीसीकडून वीज मिळते. त्यामुळे एनटीपीसीचे विक्री दर गोव्याचे खरेदी व विक्री दर त्यानुसार वीज नियमन आयोग या दरफरकास मान्यता देतो. या दोन्हीमधील दरफरक इंधनाच्या दरावर म्हणजेच कोळशाच्या दरावर अवलंबून असतात. त्यानुसार जानेवारी ते मार्च 2021 या तीन महिन्यांतील वीजदरातील चढउतारांचा फरक पुढील एप्रिल ते जून 2021 या तीन महिन्यांच्या कालावधीत वसूल करून घेण्यात येतो. त्यात दर वाढल्यास वीज महाग होते आणि दर कमी झाल्यास वीज स्वस्त होते. ही प्रक्रिया निरंतर चालूच असते, असे केणी यांनी सांगितले. वीज खात्यातर्फे हे दरपत्रक नियमितपणे राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत. त्यात प्रति युनिट दर हे पैशांतून देण्यात येतात. परंतु कुणीतरी त्यांचा अर्थ ’रुपये’ असा लावला असावा, त्यामुळेच वीज दर चार पट वाढल्याचे दाखविण्यात आले. त्यातून राज्यभरात गोंधळ निर्माण झाला. त्यात कोणतेही तथ्य नव्हते, असे केणी यांनी म्हटले आहे.