प्रतिनिधी/ वास्को
मागाच्या दोन महिन्यांपासून सुरू झालेला वेतनाचा प्रश्न्ंा सुटत नसल्याच्या निषेधार्थ मुरगाव पालिकेच्या कामगार व कर्मचाऱया काल शनिवारी काम बंद ठेवल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला. मात्र, नगराध्यक्षांनी वेळीच मध्यस्थी करून कामगारांचे मन वळवल्याने हा पेच सुटला. नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी या कामगारांना उद्या सोमवारपर्यंत वेतन थकबाकीचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.
मुरगाव पालिकेच्या काही कामगारांना मागच्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यांची थकबाकी व इतर भत्तेही अडकलेले आहेत. काहींना नोव्हेंबरचे वेतन मिळालेले नाही. तर काहींना डिसेंबरचेही वेतन मिळालेले नाही. यात हंगामी कामगारांचाही समावेश आहे. या कामगारांनी हा आर्थिक प्रश्न सोडवण्याची मागणी पालिका अधिकाऱयांकडे वारंवार केली होती. परंतु त्यांना केवळ आश्वासनच मिळाले होते. वेतनाअभावी काही कामगारांना नाताळ व नववर्षाच्या आनंदालाही मुकावे लागल्याच्या कामगारांच्या तक्रारी होत्या. त्यातच काल शनिवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास डय़ुटीवर हजर होण्यासाठी जमलेले कामगार व एका नगरसेविकेमध्ये मजूर पुरवण्याच्या प्रश्नावरून वाद निर्माण झाला. त्यामुळे कामगार अधिकच भडकले. त्यांच्या वेतन थकबाकीचा प्रश्न इथे उपस्थित झाला. संतापलेल्या कामगारांनी काम बंद ठेवण्याचा निर्णय तडकाफडकी घेतला. व सफाईची कामे सुरूच केली नाही. त्यामुळे गंभीर प्रसंग निर्माण झाला.
हा प्रकार नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांच्या कानी पडताच त्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली व नगरसेवक आणि कामगारांच्या वादात मध्यस्थी केली. मात्र, कामगारांनी त्यांना घेरावच घातला व आपल्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या. नगराध्यक्षांनी त्यांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्यानंतर सोमवारी पालिका मुख्याधिकाऱयांशी कामगारांच्या वेतनाच्या प्रश्नावर चर्चा करून योग्य तोडगा काढीन असे आश्वासन कामगारांना दिले. नगराध्यक्षांच्या या आश्वासनानंतरच कामगारांनी अखेर काम बंदचा निर्णय मागे घेतला. कामगारांनी संपाचा पवित्रा घेतल्याने सफाईची कामे तासाभरानंतरच सुरू झाली. मात्र, सोमवारपर्यंत कामगारांच्या वेतनाचा प्रश्न न सुटल्यास पुन्हा संप पुकारण्याचा इशारा या कामगारांनी दिला आहे.