5 हजार कोटींची मदत करण्याचे केंद्राला आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना संसर्गादरम्यान दिल्ली सरकारने केंद्राकडून 5 हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे. कर्मचाऱयांना वेतन देण्यासाठी निधी नसल्याने लवकरात लवकर आर्थिक मदत केली जावी असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद तसेच ट्विटद्वारे म्हटले आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहून दिल्लीसाठी 5 हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केल्याची माहिती सिसोदिया यांनी दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आर्थिक मदतीसाठी ट्विट केला आहे.
कोरोना संसर्ग आणि लॉकडाउनमुळे दिल्ली सरकारचा करसंग्रह सुमारे 85 टक्क्यांनी खालावला आहे. याच कारणामुळे राज्य सरकारला आर्थिक मदतीची गरज आहे. केंद्राकडून उर्वरित राज्यांना प्रदान करण्यात आलेल्या आपत्ती दिलासा निधीतूनही दिल्लीला कुठलीच रक्कम मिळाली नसल्याचे सिसोदिया म्हणाले.
दिल्ली सरकारच्या महसुलाचा आढावा घेण्यात आला आहे. दिल्ली सरकारला वेतन देणे आणि आवश्यक खर्च करण्यासाठी 3500 कोटी रुपयांची गरज आहे. आतापर्यंत एकूण 1,753 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. तर 7 हजार कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित होता. केंद्राकडून त्वरित दिलासा म्हणून कर्मचाऱयांचे वेतन आणि आवश्यक कामकाजासाठी 5 हजार कोटी रुपयांची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्वरित 5 हजार कोटी रुपयांची मदत केली जावी असे आवाहन सिसोदिया यांनी पत्राद्वारे केंद्रीय अर्थमंत्र्यांना केले आहे. लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी पाहता दिल्ली सरकारला 5 हजार कोटींची त्वरित गरज असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.