प्रतिनिधी/ लांजा
शॉर्ट सर्किटने आग लागून संपूर्ण दुकान खाक झाल्याची घटना रविवारी रात्री 11.30 च्या दरम्यान लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे घडली. यामध्ये दुकान व्यवसायिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वेरवली हायस्कुल शेजारी समोर प्रणय डोळस यांचे शालेय स्टेशनरी, खाऊ, दुचाकी व सायकल गॅरेज दुकान आहे. डोळस रविवारी रात्री 9. 30 वाजता दुकान बंद करून घरी गेले. रात्री 11. 30 च्या दरम्यान वेरवली बुद्रुक येथून गेलेल्या कोकण रेल्वे ट्रकवर काम करणाऱया एका कर्मचाऱयाला हायस्कूलसमोर आग लागल्याचे दिसून आले. रेल्वे कर्मचारी गावामधीलच असल्याने त्याने पोलीस पाटील प्रभाकर कुळये यांना मोबाईलद्वारे माहिती दिली. त्यानुसारपोलीस पाटील, प्रणय डोळस व काही नागरिकांना घेऊन घटनास्थळी दाखल होताच दुकानाला चारही बाजूने आग लागल्याचे दिसून आले. आगीने दुकानाला पुर्णतः वेढले होते. दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी धाव घेतलेल्या तरुणांनी पंपाच्या पाण्याने आग आटोक्यात आणली. मात्र दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.
रविवारी सकाळी तलाठी मयूर थुल, ग्रामसेवक प्रशांत डावरे, सरपंच व पोलीस पाटील प्रभाकर कुळये यांनी नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम हाती घेतले होते. या घटनेची माहिती लांजा पोलीस स्थानक व तहसीलदार लांजा यांना देण्यात आली. सोमवारी दुपारी लांजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.