प्रतिनिधी / वास्को
वेर्णा औद्योगिक वसाहतीतील पॅन्टाएर वॉटर इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या कामगारांनी काल सोमवारी वेर्णा पोलीस स्थानकासमोर आपल्या न्याय मागण्यांसाठी निदर्शने केली. गेले पाच महिने वेतन मिळालेले नसल्याचा दावा कामगारांनी केलेला असून कंपनी कामगारांवर अन्याय करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्हाला न्याय द्या अशी मागणी कामगारांनी पोलीस स्थानकासमोर केली.
पाच महिने वेतन मिळालेले नसल्याने जीवन कसे जगावे, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय उपचार कसे करावेत असा प्रश्न कामगारांनी केला आहे. सरकारने कामगारांच्या समस्यांकडे लक्ष्य द्यावे अशी मागणी या कामगारांनी केली. या कामगारांमध्ये कामगारांचे काही कुटुंबीयही सहभागी झाले होते.
गोमंतकीयांच्या हिताची काळजी असल्यास सरकारने यावर त्वरित तोडगा काढावा. कंपनी व्यवस्थापन मनमानीपणे वागत असून जो पर्यंत आमच्या समस्या सुटणार नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचे या कामगारांनी सांगितले.