प्रसाद तिळवे/ सांगे :
सांगे तालुक्मयात सर्वाधिक उंचीवर आणि रावण डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वेर्ले गावच्या निसर्गसौंदर्यात आकर्षक डेलिया फुलांनीही भर घातल्याने हा गाव सध्या खुललेला आहे. हे मनमोहक दृष्य पर्यटकांच्या डोळय़ांचे पारणे फेडणारे आहे. स्ट्रॉबेरीच्या उत्पादनामुळे वेर्ले गाव आधीच प्रसिद्धीच्या झोतात आलेला आहे.
वेर्लेसह तुडव येथील लोकांनी डेलियाची लागवड केली आहे. सर्रास ’ढाल’ म्हणून या फुलांना ओळखले जाते. वेर्ले हा डोंगराळ भाग असल्याने येथील वातावरण या फुलांना पोषक असून सध्या डेलियाची सुंदर फुले फुलल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या सानिध्यात जीवन जगणारे वेर्ले येथील लोक शेतीवरच अवलंबून आहेत. सध्या येथे फुललेली विविध रंगांची डेलिया फुले मन प्रसन्न करून सोडतात. गेल्या वीसेक वर्षांपासून नित्यनेमाने डेलियाची पावसाळय़ात लागवड केली जाते. वेर्ले येथे उत्तम प्रकारे या फुलांची लागवड होत असल्याचे सिद्ध झाले आहे, असे अशोक विचुंदेकर यांनी सांगितले.
विविध जातींच्या रोपांची लागवड
पूर्वी आपल्याकडे डेलियाच्या विविध रंगांच्या एकूण 18 जाती होत्या. आता 8 ते 10 प्रकार असून सुमारे 8 हून जास्त जातींच्या रोपांची लागवड केली आहे. कर्नाटकातील शिर्सी, यल्लापूर, कारवार इत्यादी भागांतून फुलाच्या विविध प्रकारच्या जाती आणून त्या विकसित केल्याचे विचुंदेकर यांनी स्पष्ट केले. यापूर्वी आपण काही प्रयोग करून डेलिया रोपाच्या ‘मुणली’मध्ये कृत्रिम रंग टाकून लाल रंग मिश्रीत गुलाबी फुलाची निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले. दिसायला हे फूल सुंदर दिसत असले, तरी त्याला सुगंधाचा अभाव आहे, असे ते म्हणाले.
अंगणात, परसबागेत लागवड
येथील बहुतांश रहिवाशांनी आपल्या घरासमोर अंगणात तसेच परसबागेत डेलियाची लागवड केलेली पाहायला मिळते. लाल, पांढरी, पिवळी, जांभळी, गुलाबी अशा विविध रंगांची फुले लक्ष वेधून घेतात. डेलिया हे आकर्षक फूल आहे. त्याला परसबागेचे, उद्यानाचे आकर्षण वाढविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मागणी असते. त्याची लागवड मे-जून महिन्यात केली जाते. डेलियाची रोपे मोठी झाल्यावर ती जमिनीला समांतर जाऊ नयेत म्हणून काठीचा आधार देऊन बांधून ठेवली जातात. लागवडीनंतर दीड महिन्याने फूल येण्यास सुरुवात होते. चतुर्थीच्या दरम्यान डेलियाची फुले उपलब्ध होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या जमिनीखाली ‘मुणली’ तयार होत असतात आणि लागवडीसाठी त्यांचा वापर केला जातो.
‘सुरती ढाल’चे पीक वर्षभर
या फुलांसाठी मध्यम प्रकारची, पाण्याचा निचरा होणारी व भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन लागते. या फुलाच्या रोपाचे खोड एक वर्ष जगते. पुढच्या हंगामात याच खोडाच्या वाढलेल्या कंदापासून लागवड करता येते. महिलावर्ग आपल्या केसात माळण्यासाठी डेलिया फुलांचा वापर करतो. देवालाही हे फूल अर्पण केले जाते. या फुलांमध्ये ‘सुरती ढाल’ जातीचे फूल असून त्याचे पीक वर्षभर मिळते. या जातीच्या रोपाची फांदी जरी लावली तरी फूल येते, अशी माहिती गावकऱयांनी दिली.
बाजारात चांगली मागणी
मेक्सिको देशात राष्ट्रीय फूल असलेले डेलिया इथपर्यंत आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही डेलिया फुलांची लागवड करत आहोत. रोपावर फूल पूर्णपणे आल्यावर पाच ते सहा दिवस टिकून राहते. मात्र फूल तोडल्यानंतर दोन दिवस चांगले राहते. डेलियाच्या फुलांना बाजारात मागणी आहे. पण यंदा कोरोना महामारीमुळे फुले घेऊन बाजारात जाता आले नाही. साधारणपणे फुलांना दर प्रत्येकी दहा ते बारा रुपये मिळतो, असे जया गावकर यांनी सांगितले. कृषी खात्याने याची दखल घेऊन स्वयंसाहाय्य गटांमार्फत डेलिया लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी व बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.